अडवणुकीचे थांबे – डोंबिवली
सार्वजनिक वाहतुकीचे तीनतेरा वाजलेल्या डोंबिवली शहरात मीटरने रिक्षा प्रवासाची सुविधाच उपलब्ध नसून कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमही प्रवाशांना पुरेशी सेवा पुरविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानक ते घरापर्यंत प्रवास करायचा तर रिक्षाशिवाय कोणताही ठोस सार्वजनिक वाहतूक पर्याय डोंबिवलीकरांपुढे नाही. त्यामुळे या शहरात जागोजागी रिक्षाचे अधिकृत आणि बेकायदा थांबे तयार झाले असून या व्यवस्थेचे ठोस नियोजन नसल्याने येथून प्रवास म्हणजे अडथळ्याची शर्यत बनली आहे.
डोंबिवली स्थानकाच्या आसपास रिक्षांचे दहा ते बारा थांबे आहेत. मानपाडा, लोढा, गांधीनगर, सागाव, टाटा, कल्याण, सूचक, पेंढरकर, मिलापनगर, ममता, नांदिवली, आयरेगाव, सावरकर रोड, जोशी हायस्कूल, ठाकुर्ली आदी ठिकाणी जाणाऱ्या रिक्षा येथील थांब्यावरून मिळतात. थांबे बहुत असले तरी इच्छितस्थळी जाण्यासाठी विनातक्रार रिक्षा मिळेलच याची खात्री मात्र देता येत नाही. साधारणपणे रिक्षाचालकांना लांबचे भाडे हवे असते. त्यामुळे जवळचा प्रवास ते नाकारतात.
शहरात मीटर रिक्षाच नाहीत
डोंबिवलीत केवळ शेअर रिक्षा चालतात. मीटर रिक्षाचा पर्याय येथे उपलब्धच नाही. मीटर रिक्षाने प्रवास करण्याची मागणी प्रवाशांनी केली तर तशी सेवा देणे बंधनकारक आहे. मात्र, रिक्षाचालक जुमानत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनाही शेअरचा प्रवास अंगवळणी पाडून घेतला आहे. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी तर मीटरने स्वतंत्र रिक्षा मिळणे दुरापास्तच झाले आहे. शेअरच्या नावाखाली वाहतूक पोलिसांच्या डोळ्यादेखत चार प्रवासी एका रिक्षात कोंबून येथे राजरोसपणे प्रवास सुरू असतो.
सुट्टय़ा पैशांचा वाद
सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला लोकल पकडण्याची घाई असते. दहा ते पंधरा मिनिटांचे अंतर असणाऱ्या प्रवाशांकडून हे चालक आठ रुपये भाडे आकारतात आणि दोन रुपये सुट्टे द्यावेत असा आग्रह धरतात. प्रवासी दहा रुपयांची नोट चालकांच्या हाती ठेवतात, तेव्हा सुट्टे नाहीत असे सांगितले जाते. घाईगर्दीत मग दोन रुपयांवर पाणी सोडून प्रवासी स्थानकाची वाट धरताना दिसतात.
परिवहनचा सावळागोंधळ
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन व्यवस्थेचा सावळागोंधळ येथील प्रवाशांच्या पाचवीला पुजला आहे. शेअर रिक्षाचे भाडे आणि बसचे भाडे एकच असल्याने रिक्षाचा पर्याय नक्कीच चांगला असाही विचार प्रवासी करतात. परिवहनच्या थांब्यावर आडव्या रिक्षा उभ्या करून अडवणूक करण्याची परंपरा येथे कायम आहे.
वाहतूक कोंडी
रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिक्षांचे थांबे, प्रवाशांच्या रिक्षासाठी रांगा, फेरीवाल्यांची दाटी, जवळच परिवहनचा बसथांबा, वाशी-पनवेल बसथांबा असे सगळे एकाच ठिकाणी असल्याने स्टेशन परिसरात संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
रिक्षाचालक अर्धा अधिक रस्ता व्यापतात. त्यामुळे कोंडीत अधिक भर पडते. मानपाडा रस्त्याच्या सीमेंट कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने येथे मातीचे ढिगारे पडलेले दिसतात. एक रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, तर कुठे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. या सर्व गोष्टींमुळे इंदिरा चौकात वाहनांची गर्दी होते. वाहतूक पोलीसही ही कोंडी सोडविताना हतबल असल्याचे चित्र दिसते.

परिवहनच्या फेऱ्या
निवासी भाग, कल्याण तसेच शहरातील अंतर्गत भाग अशा सर्व मिळून परिवहनच्या दिवसाला दोनशेच्या आसपास फे ऱ्या होतात. निवासी, खोणी, गांधीनगर, दावडी, भोपर, शिरढोण, लोढा, रेतीबंदर, वाशी, कल्याण, रामनगर आदी भागात परिवहनच्या बसेस धावतात.

नियोजित रिक्षा थांबे
डोंबिवली पूर्व – ३७
डोंबिवली पश्चिम – ५४