लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : करोनाकाळात सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याच्या नावाखाली बदलापूर आणि अंबरनाथ शहरांत रिक्षाचालकांनी लागू केलेली मनमानी भाडेवाढ कायम आहे. याआधी दोनच प्रवाशांसह अधिकचे भाडे घेतले जात होते. मात्र, आता रिक्षात चार प्रवासी घेतले जात आहेत. त्यांच्याकडून अधिकचे भाडेही वसूल केले जात आहे.

करोनाकाळातील काही नियम शिथिल केल्यानंतर रिक्षाचालकांनी सुरुवातीला दोन प्रवाशांसह वाहतूक सुरू केली. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी २८ नोव्हेंबर रोजी मनाई आदेश जारी केला होता. त्यानंतरही बदलापूर आणि अंबरनाथ शहरांतील रिक्षांमध्ये दोनऐवजी चार प्रवासी घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात तक्रारी केल्यानंतर रिक्षा संघटना आणि प्रादेशिक परिवहन विभाग प्रवाशांनाच दोनपेक्षा अधिक प्रवासी असल्यास प्रवास करू नका, असे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्ष चार प्रवासी बसवल्याशिवाय रिक्षा सुरू केली जात नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे.

टाळेबंदीत प्रवासी संख्या कमी असल्याचे सांगत रिक्षाचालकांनी भाडय़ात दुपटीने वाढ केली. बदलापूर पूर्व रेल्वे स्थानक ते कात्रप चौक या किलोमीटर अंतरासाठी २० रुपयांचा भरुदड प्रवाशांना सोसावा लागत आहे. बदलापूर पश्चिमेला किलोमीटरसाठी १५ ते २० रुपये भाडे आकारले जात आहे.

याबाबत रिक्षाचालकांना जाब विचारताच त्यांच्याकडून अरेरावी केली जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या या भाडेवाढीला सुरुवातीला प्रवाशांनी विरोध केला नाही. टाळेबंदीत आर्थिक नुकसान नको म्हणून रिक्षाचालकांना सहकार्य केले. मात्र आता रिक्षाचालक चार प्रवासी बसवूनही भाडे दुप्पटच आकारत असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे.

‘जादा पैसे देऊ नका’

दुप्पट भाडे आकारले जात असल्याबाबत रिक्षा चालक-मालक संघटनेच्या प्रतिनिधींना संपर्क केला. त्या वेळी त्यांनी प्रवाशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रिक्षात चार प्रवासी असल्यास प्रवाशांनीच कमी भाडे द्यावे, असे रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. बदलापूर पूर्वेतील रिक्षा चालक-मालक संघटनेच्या किशोर देशमुख यांना याबाबत विचारले असता, टाळेबंदीत वाढवलेले भाडे लवकरच कमी केले जाणार आहे असे त्यांनी सांगितले आहे. तसेच प्रवाशांनीही अतिरिक्त भाडे देऊ  नये, असे आवाहन त्यांनी केले.