मध्यंतरीच्या काळात युटय़ूब वाहिनीवर एक चित्रफित खूप लोकप्रिय झाली. एका विमानात प्रवासी आपले सामान विसरून जातात. विमानातील संरक्षक हे सामान तपासण्यासाठी एका श्वानाला विमानात पाठवतात. हे श्वान ब्रीड इतके हुशार की विमानतळावर असणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्यांचे सामान परत नेऊन देण्याचे काम अत्यंत चपळाईने करते. या श्वानाच्या हुशारीची तारीफ सर्वत्र होते. वासावरून वस्तू शोधणारे अत्यंत हुशार, चपळ असणारे श्वान ब्रीड म्हणजे बिगल. इंग्लंडमध्ये १८३० च्या काळात या बिगल श्वानांची उत्पत्ती आढळते. राणी एलिझाबेथचे ‘बिगल’ हे आवडते श्वान होते, असे म्हटले जाते. भारतात इंग्रजांचे आगमन झाल्यावर इंग्रजांसोबत बिगल श्वान भारतात आले.
शिकार करण्यासाठी उपयुक्त असणारे श्वान अशी बिगलची ओळख आहे. उंची साधारण १२ ते १४ इंच असणारे बिगल श्वान आकाराने लहान असतात. आकाराने लहान असले तरी कळपाने शिकार करण्यासाठी हे श्वान उपयुक्त आहेत. फार मोठय़ा प्राण्यांची शिकार करत नसले तरी कोल्हा, रानडुक्कर, पक्षी यांची शिकार करण्यात हे तरबेज असतात. वासावरून वस्तू शोधून काढण्यासाठी ‘लॅबरेडोर’ हे श्वान ब्रीड लोकप्रिय असले तरी अलीकडे आपल्या हुशारीने वस्तू शोधून काढण्यात बिगल श्वान देखील लोकप्रियता मिळवू लागले आहेत.
विमानतळावरील संरक्षक
अलीकडे जगभरातील विमानतळावर ज्या ठिकाणी सामानांची देवाणघेवाण होते त्या ठिकाणी सामानाची तपासणी करण्यासाठी बिगल श्वानांचा उपयोग केला जातो. नार्को टेस्ट, अमली पदार्थ वासावरून शोधून काढण्यासाठी बिगल श्वान वापरले जातात. वास घेण्याच्या आपल्या कौशल्यामुळे हे बिगल श्वान प्राणी शोधण्यासाठी देखील एखाद्या यंत्रासारखे काम करतात. दिसायला अतिशय लहान असले तरी या कुत्र्यांची चपळता आणि हुशारी यामुळे बिगल जगभरात लोकप्रिय आहेत.
या श्वानांचे केस लहान असतात. तीन रंगांतील बिगल श्वान अतिशय लोकप्रिय असतो. मूळ पांढरा रंग आणि काळा आणि तपकिरी रंगाचे पट्टे या कुत्र्यांच्या शरीरावर पहायला मिळतात. विविध ‘डॉग शो’मध्येसुद्धा बिगल कुत्रे पहिल्या आठ क्रमांकाच्या स्थानकावर असतात. भारतातदेखील बिगल श्वान ब्रीड लोकप्रिय आहे. साधारण १७,००० ते ४०,००० अशा किमतीपर्यंत हे श्वान बाजारात उपलब्ध आहेत.
या कुत्र्यांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. केससुद्धा लहान आणि थोडय़ा प्रमाणात कडक असल्याने जास्त गळण्याची शक्यता नसते. दिवसांतून एकदा या कुत्र्यांच्या शरीरावरील केसांवरून कंगवा फिरवला तर उत्तम राहतात. मात्र, शरीराचा रंग पांढरा असल्याने पटकन शरीर मळते. त्यासाठी दिवसातून एकदा शरीरावरून ओला कपडा फिरवल्यास हे कुत्रे स्वच्छ राहतात. फारसे आजार या कुत्र्यांना उद्भवत नसल्याने सांभाळण्यासाठी अतिशय सोपे श्वान ब्रीड आहे. हुशार असल्याने प्रशिक्षणाच्या दरम्यान बिगल कुत्रे उत्तम प्रतिसाद देतात. आज्ञाधारक असल्याने प्रशिक्षकाने शिकवलेले पटकन आत्मसात करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मॉडर्न सव्‍‌र्हिस डॉग’
कॅनडा, अमेरिका, जपान अशा देशांमध्ये शेती विभागात तसेच अवजड सामानांची ने-आण करण्याच्या ठिकाणी बिगल श्वान ब्रीड उपयोगात आणतात. महत्त्वपूर्ण कामातील चोखपणा म्हणूनच बिगल श्वानांना ओळखले जाते. न्यूयॉर्कमधील काही हॉटेल्समध्ये ढेकूण शोधण्यासाठी या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले गेले. ढेकूण शोधण्यासाठी बिगल कुत्र्यांना काही हॉटेल्समध्ये ठेवण्यात आले होते. काही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या थेरपीसाठी बिगल श्वान ब्रीड पाळले जातात.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beagle dog
First published on: 22-03-2016 at 03:22 IST