सध्या खवय्ये परदेशातील पदार्थाच्या प्रेमात आहे. देशोदेशीच्या पदार्थाना चांगली पसंती मिळू लागली आहे. पिझ्झा असो वा पास्ता, चायनीज मोमोज असो वा शोर्मा. भरपेट खाऊन झाले की डेझर्ट लागतेच. यात आइस्क्रीम, ज्यूस वा केकला प्राधान्य दिले जाते.  मुसळधार पावसात जसे गरमागरम, चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात, अगदी तसेच थंडगार आइस्क्रीमही छान लागते. सप्टेंबर महिन्यातल्या लांबलेल्या पावसात थोडे वेगळ्या चवीचे आइसक्रीम खावेसे वाटले तर डोंबिवलीत मिळेल. फडके रोडवरील ‘कॅफे डेझर्ट’ मध्ये नायट्रोजनयुक्त आइसक्रीम आणि चॉकलेट स्टिक हे आइसक्रीमचे दोन नवीन प्रकार मिळतात.

आइसक्रीमचे हे दोन्ही प्रकार पाहता क्षणीच आश्चर्य वाटते. वाफाळत्या चहाप्रमाणे धुरकटलेले हे थंड पदार्थ खाताना आगळीच मजा येते. खाण्यायोग्य असलेला नायट्रोजन वापरून हे आइसक्रीम तयार केले आहे. नायट्रोजन बिस्किट, नायट्रोजन बॉल्स वापरून तो तयार केल्याची माहिती ‘कॅफे डेझर्ट’च्या मोनील रसाळ यांनी दिली. मुंबई परिसरात अगदी मोजक्या ठिकाणी हे आइसक्रीम मिळते. मोनील यांनी थायलंड इथून नायट्रोजन आइसक्रीम बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. परदेशातून आणलेल्या खास यंत्रातून खाण्यायोग्य नायट्रोजन बनविले जाते. त्याचबरोबर तवा आइसक्रीममध्येही नायट्रोजन मिसळले जाते. मात्र तवा आइसक्रीम खाताना त्यातून कोणताही धूर निघत नाही, मात्र नायट्रोजन चॉकलेट स्टिक किंवा नायट्रोजन बिस्किट खाताना त्यातून निघणाऱ्या धुरामुळे तरुण पिढी त्याकडे अधिक आकर्षित होते.

चॉकलेट स्टिक खाताना नायट्रोजनमुळे कोणत्याही प्रकारे चव बदलत नाही. काय मस्त मज्जा आली, असे म्हणत चॉकलेट स्टिक तसेच चॉकलेट बिस्किट खवय्ये अगदी सहज फस्त करतात. चॉकलेट स्टिक तसेच नायट्रोजन बिस्किट बघितल्यानंतर खवय्यांना उपाहारगृहात मिळणाऱ्या सिझलर्सची येते. कारण नायट्रोजन बिस्किट किंवा चॉकलेट स्टिकमधून निघणारा धूर हा सिझलर्ससारखाच दिसतो. धूर येत असल्यामुळे या चॉकलेट स्टिकला स्मोक सिगार, चॉकलेट बॉल्सला स्मोक बॉल आणि बिस्किटाला स्मोक बिस्किट अशी नावे मोनील यांनी दिली आहेत. हे पदार्थ खाताना ते जिभेवर गोल गोल फिरवून नंतर चावले की त्यातून अधिक धूर निघतो आणि पदार्थाची चवही वाढते. येथे मिळणारे किवीचे नायट्रोजन आइसक्रीम अगदीच खास आहे. त्यामुळे खवय्ये त्याला अधिक पसंती देतात.

या व्यतिरिक्त इथे अन्य नेहमीच्या स्वादाचे आइसक्रीमही मिळतात. त्यामध्ये केशर पिस्ता, किवी, फणस आदी प्रकारचे विविध स्वाद असेलेले आइसक्रीम मोनील यांनी घरीच तयार केले आहेत. मिंट माव्‍‌र्हलमध्ये मिंट खाल्याचा भास होतो. त्या मिंटची चव जिभेवर बराच काळ रेंगाळते. मिल्कशेक जसे असते तसेच येथे मिळणारे फ्रिक शेकसुद्धा तितकेच प्रसिद्ध आहे. यामध्ये विविध स्वादांचे तयार केलेले द्रव पदार्थ असतात. त्यामध्ये मिल्कमेड तसेच क्रीम टाकले जाते. त्यावर केक तसेच चॉकलेटचे टॉपिंग केलेले असते. राजभोग, रोमँटिक रोज, अमेरिकन नट्स, क्लासिक कॉफी, गुलकंद, केसर बदाम आदी प्रकारात हे नायट्रो फ्रीक शेक उपलब्ध आहे.आत्तापर्यंत गरमागरम पिझ्झा आपल्यापैकी बहुतेकांनी खाल्ला असेल परंतु येथे मिळणारा आइसक्रीम पिझ्झा म्हणजे लाजवाब आहे. पिझ्जा बेसवर नायट्रो आइसक्रीम चॉकलेटचे टॉपिंग असते. ते खाताना चॉकलेट आवडणाऱ्या खवय्यांसाठी ही मोठीच मेजवानी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कॅफे डेझर्ट

  • कुठे?- टिळक रोड, ब्राह्मण सभेजवळ, डोंबिवली (पू.)