विरारमधील चार बिल्डरांविरोधात गुन्हा

सर्वसामान्य ग्राहकाला घर देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या विरारमधील चार बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच वर्षांपासून एका ग्राहकाकडून सात लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती.

गोरेगाव येथे राहणारे पांडुरंग पवार (३४) हे खासगी नोकरी करतात. २०१३ मध्ये त्यांनी विरारमध्ये घर घेण्यासाठी श्री खोडियार बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीत संपर्क केला होता.

कंपनीच्या बिल्डरांनी फिर्यादी पवार यांच्याकडून सात लाख रुपये घेतले होते. घराचा ताबा नंतर दिला जाईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र पाच वर्षे उलटून गेले तरी त्यांना घराचा ताबा मिळाला नाही.

फिर्यादी पवार आपले पैसे परत घेण्यासाठी बिल्डरच्या कार्यालयाच्या चकरा मारत होते, मात्र त्यांना पैसेही परत केले नाही आणि घराचा ताबाही दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पवार यांच्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी श्री खोडियार बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे चार भागीदार रामकृपाल मिश्रा, जयशंकर यादव, तेजधर तिवारी आणि रमाशंकर यादव यांच्यावर यांच्यावर फसवणुकीच्या कलम ४२० (३४) सह एमपीआडी अ‍ॅक्टच्या १९९९ च्या कलम ३,४ सह मोफा कायदा कलम ३,४ व ८ अन्वये गुन्हा दाकखले केला आहे