सागर नरेकर
अंबरनाथ : अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी मार्च महिन्यात धरण रिते करून केले जाणारे हे काम यंदाच्या वर्षांत टाळण्यात आले. त्यामुळे चिखलोली धरण विस्तारीकरणाचे काम वर्षभरासाठी लांबणीवर पडल्याचे समोर आले आहे. मे २०२२ अखेरीस हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. आता पुढील वर्षी मे महिन्याची मुदत यासाठी देण्यात आली आहे.
चिखलोली धरण हे अंबरनाथ शहरासाठी पाण्याचा स्वत:चा स्रोत आहे. त्यामुळे शहरातील या पाण्याच्या स्रोताची क्षमता वाढवण्यासाठी आणि एकंदरीत अंबरनाथ शहराची पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी ७७ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. यात प्रामुख्याने चिखलोली धरणाची उंची वाढवण्याचे काम नियोजित होते. सध्याच्या घडीला चिखलोली धरणातून अंबरनाथ शहराला दररोज सहा दशलक्ष घनलिटर पाणी दिले जाते. ही क्षमता वाढवण्यासाठी धरणाची उंची वाढवण्याचे काम केले जाणार होते. यात चिखलोली धरणाची उंची अडीच मीटरने वाढवण्यात येणार आहे. या वाढीमुळे धरणात ०.८० दशलक्ष घनलिटर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. मात्र सुरुवातीपासूनच या कामाला उशीर होत गेला.
सहा वर्षांपूर्वी या कामाचे प्रस्ताव तयार होते. मात्र संकल्पचित्र वेळीच न मिळाल्याने कामाला उशिराने सुरुवात झाली. २०१९ या वर्षांत या कामासाठी ३१.१० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात झाली होती. मार्च २०१९ मध्ये या कामासाठी धरण पूर्णत: रिकामे करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरू होताच काम पुन्हा बंद पडले होते. २०२० मध्ये कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोनाच्या संकटात टाळेबंदी जाहीर झाल्याने काम पुन्हा बंद झाले. २०२१ मध्ये लवकर पावसाळा सुरू झाल्याने काम अपूर्ण राहिले. त्यामुळे कामावर पुन्हा परिणाम झाला होता. उंची वाढवण्याची मुदत एप्रिल २०२० वरून एप्रिल २०२१ पर्यंत वाढवण्यात आली होती. गेल्या वर्षांत ही मुदत पुन्हा एक वर्षांने वाढवून मे २०२२ करण्यात आली होती. मात्र यंदाही धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला सुरुवातच झाली नाही. शहराला अविरत पाणीपुरवठा करण्यासाठी धरण रिते केले गेले नाही. परिणामी यंदा उंची वाढवण्याचे काम सुरूच होऊ शकले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षांतही धरणाचे काम रखडले असून धरणाच्या विस्तारीकरणाचे काम एक वर्षांने लांबणीवर पडले आहे. लघू पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून धरणाचे काम पूर्ण करण्याची नवी मुदत मे २०२३ असल्याचे अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे.