ट्रक, टेम्पो उभी राहत असल्याने नागरिक हैराण;

ठाणे : घोडबंदर येथील कापूरबावडी, बाळकूम, गायमुख, भाईंदर पाडा तसेच वागळे इस्टेट मॉडेला चेकनाका या भागांत गेल्या काही वर्षांपासून ट्रक आणि कंटेनर चालक रस्त्याकडेला त्यांची वाहने उभी करून त्याच ठिकाणी नैसर्गिक विधी, आंघोळ करणे, अन्न शिजविण्याचे प्रकार करत आहेत. याच भागात सकाळी नागरिक मोठय़ा प्रमाणात चालण्यास येत असून ते टेम्पोचालकांच्या कृत्यामुळे हैराण झाले आहेत, तसेच महिलांचीही कुचंबना होत आहे. या चालकांविरोधात पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ठाणे आणि भिवंडी शहरात मोठय़ा प्रमाणात मालवाहतूकदार गाडय़ा ये-जा करत असतात. हे वाहनचालक गेल्या काही वर्षांपासून कापूरबावडी ते बाळकूम, घोडबंदर येथील गायमुख ते भाईंदरपाडा तसेच वागळे इस्टेट येथील मॉडेला चेकनाका मुख्य रस्त्यालगत वाहने उभी करून आराम करत असल्याचे दिसून येते. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. त्यातच आता हे वाहनचालक टेम्पो, ट्रकमध्ये अन्न शिजविणे, परिसरातील पदपथांवर उघडय़ावर आंघोळ करणे आणि अर्धनग्न अवस्थेत फिरणे असे प्रकार करू लागले आहेत. याशिवाय काही जण त्याच भागात उघडय़ावर नैसर्गिक विधी उरकतात. घोडबंदर तसेच वागळे इस्टेट भागात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती आहे. या भागातील अनेक नागरिक सकाळी आणि रात्रीच्या वेळी परिसरात फेरफटका मारतात. त्याच वेळी ट्रक, कंटेनर चालक पदपथांवर अर्धनग्न अवस्थेत झोपलेले असतात. यामुळे महिलांची कुचंबना होते. या ट्रक-टेम्पो चालकांमुळे आम्हाला ये-जा करण्यास भीती वाटत असते, असे एका महिलेने सांगितले. यासंदर्भात कापूरबावडी वाहतूक पोलीस कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लांभाते यांना विचारले असता, ट्रक आणि टेम्पो चालकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

घोडबंदर भागात या ट्रकचालकांची नवी समस्या निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस त्यांचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याकडेला झोपणे, अन्न शिजवणे, आंघोळ करणे असे प्रकार त्यांच्याकडून घडत असतात. महिलांच्या सुरक्षेलाही त्यामुळे धोका पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रक-टेम्पो चालकांना ट्रक टर्मिनस झाल्यास ही समस्या मिटेल.

गिरीश पाटील, रहिवासी, कासारवडवली.

‘ट्रक टर्मिनसचा भूखंड ताब्यात घ्या’

शहरातील ट्रक टर्मिनससाठी आरक्षित असलेला मॉडेला कंपनीजवळील १७,२१० चौरस फुटांचा भूखंड ठाणे महालिकेने ताब्यात घ्यावा, नाहीतर हा भूखंड गिळंकृत होण्याची भीती आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. २०१७ पासून येथे ट्रक टर्मिनसचे आरक्षण आहे. वाहन तळाची गरज असताना या मोक्याच्या भूखंडावर नक्की कोणाचा डोळा आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी यासंदर्भात पालिकेने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली .