रस्त्याचे खड्डे भरण्याच्या कामाच्या बिलासाठी एका कंत्राटदार कंपनीशी संबंधित दोघांनी उल्हासनगर महापालिका मुख्यालयात लेखा विभागातील आवक-जावक लिपिकाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित लिपिकाच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित संजय चांदनानी आणि अजय चांदनानी अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालिकेतील कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

उल्हासनगर महापालिका मुख्यालयात लेखा विभागात आवक-जावक लिपिक पदावर कार्यरत असलेले संदीप बिडलान (३३) नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात फायलींच्या प्रक्रिया करत होते. सव्वा एक वाजण्याच्या सुमारास जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असलेले संजय चांदनानी आणि अजय चांदनानी हे दोघे पालिका मुख्यालयात आले. त्यांच्या जय भारत कन्स्ट्रक्शन कंपनीचे एक बिल पालिकेत प्रलंबित होते. त्या बिलाची फाईल मार्गी लावण्याचा तगादा त्यांनी लिपिक संदीप बिडलान यांच्याकडे लावला. कोणतीही फाईल पूर्णपणे तपासल्याशिवाय पुढे पाठवली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश वरिष्ठांचे असल्याचे सांगत संदीप बिडलान यांनी त्यांना प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला. मात्र चांदनानी बंधूंनी रागाच्या भरात संदीप बिडलान यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपण माझ्या वरिष्ठांशी बोला, असे सांगत बिडलान या दोघांना घेऊन मुख्य लेखा अधिकारी यांच्या कार्यालाकडे जात असताना संजय चांदनानी आणि अजय चांदनानी यांनी बिडलान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकांनी दोघांना पकडत मारहाण थांबवली.

याप्रकरणी बिडलान यांच्या तक्रारीनंतर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात संजय चांदनानी आणि आणि अजय चांदनानी या दोघांवर शासकीय कामात अडथळा आणि शिवीगाळ आणि मारहाण करण्यात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका मुख्यालयात अशा कोणत्याही प्रकारच्या घटनांना थारा नाही. त्यामुळे आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. या प्रकारानंतर कंत्राटदारांच्या कामगारांची पालिकेतील मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.