ठाणे : इंडिया आघाडी पराभवाच्या भीतीने भरकटली आहे. ठाकरे गटाने पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली आहे. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीत उतरविले आहे. त्याच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकू लागले आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केली.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. निवडणुकीचा महाराष्ट्रातील अखेरचा टप्पा सुरू होत असताना मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकेचे प्रहार सुरू केले आहेत.

हेही वाचा >>> रणरणत्या उन्हात कार्यकर्ते कल्याणमधील मोदींच्या सभेसाठी; भिवंडी, कल्याण ग्रामीण भागातून सर्वाधिक गर्दी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे, बाळासाहेबांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असे म्हणणारे समाजवादी, काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही आणि पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असे सांगणारे फारुख अब्दुल्ला यांना कसे चालतात? बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील, असे शिंदे म्हणाले.

मोदी यांच्यावर स्तुतिसुमने

छत्रपती शिवाजी महाराजांवर मोदी यांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यांनी नौदलाच्या ध्वजावर शिवमुद्रा उमटवली. सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, त्यांच्या कार्यकाळात शिवजयंती साजरी झाली, शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.

कल्याण, भिवंडी, ठाणे जिंकल्यात जमा

नरेंद्र मोदी हे जनतेच्या हृदयातले पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये पाऊल पडल्याने भिवंडी, कल्याण आणि ठाणेदेखील आपण जिंकल्यात जमा आहे असे वातावरण तयार झाले आहे, असा दावा शिंदे यांनी केला.