तक्रार मांडण्यासाठी नागरिकांनी थेट अर्ज करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आवाहन
ठाणेकरांच्या समस्या वेगाने मार्गी लागाव्यात यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनात यापुढे राजकीय नेते, पक्ष तसेच नगरसेवकांच्या लेटरहेडवरील तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. लोकशाही दिनात तक्रारी मांडायच्या असतील तर त्या वैयक्तिक स्वरूपात मांडल्या जाव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या या निर्णयामुळे राजकीय कुबडय़ा वापरत एखादी तक्रार पुढे रेटण्याच्या प्रयत्ना करणाऱ्यांना लगाम बसणार आहे.
शासकीय तसेच निमशासकीय संस्थांशी संबंधित असलेल्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी राज्य सरकारने २०१२ पासून लोकशाही दिनाची संकल्पना पुढे आणली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय प्रमुखांनी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तक्रारदारांच्या अर्जाचा स्वत उपस्थित राहून निपटारा करावा, असे ठरविण्यात आले. प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान तक्रारींच्या निवेदनाचा पाऊस पडू लागल्याने ऐनवेळी आलेल्या तक्रारींचा निपटारा करणे कठीण होऊ लागले. त्यामुळे लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता निवेदनाच्या दोन प्रती १५ दिवस आधी स्वीकारल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी सध्या सुरू असली तरी अनेक तक्रारदार राजकीय पक्ष, नगरसेवक आणि पुढाऱ्यांची संदर्भपत्र घेऊन तक्रारी मांडत असल्याचे निदर्शनास आले आहे. लोकशाही दिनास नागरिकांना थेट तक्रार मांडण्याचा अधिकार असताना राजकीय पक्षांच्या किंवा नेत्यांच्या लेटरहेडच्या कुबडय़ा कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, एखाद्या नगरसेवकाचे पत्र तक्रारीस जोडल्यास त्या अर्जाची तातडीने दखल घेतली जाईल, अशी समजूत अनेक तक्रारदारांनी करून घेतली होती. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र तक्रारींचे ‘वजन’ वाढविण्यासाठी जोडले जाणाऱ्या राजकीय संदर्भपत्रांना केराची टोपली दाखविली जाईल, असे स्पष्ट आदेश दिले असून यापुढे साध्या कागदावर आपल्या तक्रारी वेळेत मांडाव्यात अशा सूचना दिल्या आहेत. लोकशाहीदिनी प्रत्येक नागरिकास कोणाच्याही संदर्भाशिवाय थेट प्रशासकीय प्रमुखाकडे तक्रार मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. असे स्वातंत्र्य इतर दिवशीही आहेच. मात्र, लोकशाही दिनानिमित्त तक्रारींचा निपटारा वेगाने व्हावा असा प्रयत्न असतो. त्यामुळे राजकीय पत्राची आवश्यकता नाही, अशा सूचना जयस्वाल यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

६ सप्टेंबर रोजी ठाण्याचा लोकशाही दिन
ठाणे महापालिकेमार्फत येत्या ६ सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी महापालिका कार्यालयात तक्रारींच्या दोन प्रती सादर केल्या जाव्यात, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी केले आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी म्हणजेच दिनांक २२ ऑगस्ट, २०१६ पूर्वी निवेदन महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत, तसेच त्या निवेदनावर १ महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे, असेही माळवी यांनी स्पष्ट केले. आस्थापनाविषयक, विविध न्यायालयात, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत, असेही माळवी यांनी स्पष्ट केले.