महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत जुनेच चेहरे दिसून येत आहेत. मोजक्याच प्रभागांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विविध कार्यक्रम, उपोषण, मोर्चे करणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसने उमेदवारीत स्थान दिले आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे.

काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांचे नगरसेवकपद रद्द होऊनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोटे यांचे प्रकरण न्यायालयात असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महापालिकेने निवडणूक अधिकाऱ्यांना पोटे यांच्यावरील कारवाईबाबत कळवले तर मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारताना अधिकाऱ्यांकडून विचार होऊ शकतो, असे एका जाणकाराने सांगितले.
अरुण गीध, शारदा पाटील, नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, नवीन सिंग, रत्नप्रभा म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, जान्हवी पोटे या माजी नगरसेवकांचा उमेदवारांमध्ये समावेश आहे. नवीन चेहऱ्यांमध्ये माजी नगरसेवक संतोष केणे यांचे चिरंजीव राहुल व प्रणव केणे, जितेंद्र मुळ्ये, कांचन कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.