दोन कोटी खर्चूनही आवश्यक परवानग्या नसल्याने विद्यालयाला टाळे
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बदलापूर गावात दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले शासकीय तंत्र विद्यालय बांधकाम परवानगीशिवायच उभे केले गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याआधी विद्यालय सुरू झाले नसल्याबद्दल राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलन केले होते. मात्र या विद्यालयाच्या इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला नसून हे विद्यालय सुरू करण्यात अडचणी येत आहेत.
ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदलापूर गावात जिल्हा परिषदेच्या तंत्रशिक्षण विद्यालयाला मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या शाळेसाठीची जागा देण्यात आली होती. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे त्यानंतर तात्काळ हे विद्यालय सुरू करण्याची गरज होती. मात्र विद्यालय वेळेत सुरू न झाल्याने येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता जवळच्या बदलापूर हायस्कूलमध्ये वर्ग भाडेतत्त्वावर घेण्यात आला होता. त्या वर्गासाठी शाळेला दरमहा २४ हजार रुपये भाडे द्यावे लागते आहे. या भाडय़ापोटी आतापर्यंत तब्बल ५ लाखांहून अधिक रक्कम द्यावी लागली आहे.
त्यामुळे सरकारचा कोटय़वधींच्या खर्चासह लाखो रुपयांचा चुराडा सध्या होतो आहे. त्यामुळे यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनाअभावी रखडल्याचा आरोप होत असलेले हे विद्यालय सुरू होण्यात वेगळीच बाब अडचण ठरत असल्याचे आता समोर आले आहे. त्यात या इमारतीच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी कुळगाव बदलापूर पालिकेकडून घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ९९ वर्षांच्या करारावर ही जागा देण्यात आल्याचे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचीही बाब समोर आली आहे. परवानगी न घेता उभ्या केलेल्या या इमारतीला परवानगीच नसल्याने आता पूर्णत्वाचा दाखलाही मिळत नसल्याने याचे उद्घाटन होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच कोटय़वधींचा खर्च करून तयार केलेले हे तंत्र विद्यालय धूळ खात पडले आहे.
दरम्यान, बांधकाम परवानगी नसल्याने पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यात अडचणी येत असून त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यालय सुरू होण्यास अद्याप मोठा काळ जाणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आणखी काही महिने विद्यार्थ्यांना भाडय़ाच्या वर्गातच शिक्षण घ्यावे लागणार आहे.
बांधकाम झालेल्या इमारतीत वर्ग भरविण्याची मागणी
अपुऱ्या साधन सामग्रीत शिकण्याची वेळ सध्या या तंत्र शिक्षण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर आली आहे. काही विद्यार्थ्यांना बाक नसल्याने जमिनीवर बसूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे तयार असलेल्या इमारतीत वर्ग भरवण्याची मागणी आता विद्यार्थी करत आहेत.
इमारतीचे आराखडे, नकाशे न सादर करताच बांधकाम केले गेले ही बाब खरी आहे. मात्र त्यांनी जानेवारीत भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यानुसार नगरविकास साहाय्यक संचालकांकडे याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यावर आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठपुरावा करत प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे.
– प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका
परवानगीशिवाय काम केले गेले नाही. मात्र भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने तांत्रिक विभागाने या वास्तूचा ताबा घेतला नाही. मात्र त्यासाठी विभागाकडून अर्ज करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम फक्त वास्तू उभी करण्याचे असते. लवकरच त्या वास्तूचा ताबाही घेतला जाईल.
– राजेश सोमवंशी, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
