बेकायदा मंडप, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेची तक्रार यंत्रणा

ठाणे शहरातील रस्त्यांवर साजरे होणाऱ्या उत्सवांकरिता महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी प्रशासनाने ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यन्वित केली आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांना आता बेकायदा मंडप आणि ध्वनी प्रदुषणासंबंधीच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक, ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नोंदविणे शक्य होणार आहे. या तक्रारीच्या आधारे संबंधित विभागाकडून कारवाई केली जाणार असून त्याचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यामुळे तक्रारीवर नेमकी काय कारवाई झाली, याबाबत ठाणेकरांना माहिती मिळणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरु झाली आहे. नियमात ठरवून दिलेल्या आवाजाच्या पातळीपेक्षा उत्सवातील आवाजाची पातळी जास्त असल्याचे यापुर्वीच्या कारवाईतून उघड झाले आहे. या संदर्भात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांकरिता नियमावली तयार करण्याच्या सुचना राज्यातील सर्वच महापालिकांना दिल्या होत्या.

त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यावर साजरे होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांकरिता नियमावली तयार केली असून त्यास  सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिलेली आहे. गेल्या वर्षीपासून या नियमावलीची शहरात महापालिकेने अंमलबजावणी सुरु केली असून यंदाही नियमावलीचे पालन करण्याच्या सुचना पालिकेने गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत दिल्या आहेत. त्याचबरोबर आता उत्सवांसाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाईची तयारी पालिकेने सुरु केली असून त्यासाठी नागरिकांना बेकायदा मंडप आणि ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.

तक्रार नोंदवा

बेकायदा मंडप तसेच ध्वनी प्रदुषणविरोधात नागरिकांना तक्रार करणे शक्य होणार आहे. १८००-२२२-१०८ या टोल फ्री क्रमांकावर तसेच rdmc@thanecity.gov.in या ई-मेलवर नागरिक तक्रार नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे ७५०६९४६१५५ या क्रमांकावर व्हॉटस अ‍ॅप किंवा एसएमएसद्वारे तक्रार नोंदविता येऊ शकते. त्याचबरोबर ०२२-०२५३७१०१० या दुरध्वनी क्रमांकावरही तक्रार नोंदविण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

कारवाई अशी

तक्रार निवारण यंत्रणेद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दखल घेतली जाणार आहे. त्यानंतर ध्वनी प्रदुषणसंबंधीच्या तक्रारींवर स्थानिक पोलिसांकडून, वाहतूक व्यवस्थापनाच्या तक्रारींेवर वाहतूक पोलिसांकडून आणि मंडपासंदर्भातील तक्रारींवर प्रभाग समिती सहायक आयुक्तांकडून कारवाई केली जाणार आहे. या तक्रारींवर केलेल्या कारवाईची माहिती तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रारींवर काय कारवाई झाली, याची माहिती उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यासाठी या यंत्रणेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.