करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने टाळेबंदीची घोषणा केलेली असूनही ठाणे जिल्हातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर, शहापूर या शहरांमध्ये भाजीपाला आणि फळे खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन होत असून करोना विषाणू संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही गर्दी रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलल महापालिका आणि नगरपरिषद क्षेत्रातील भाजी मंडई, फळे आणि भाजीपाला दुकाने १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले. या आदेशानंतरही शहरांमधील भाजीपाला आणि फळांची दुकाने खुली दिसल्यास कायदेशीर कारवाई करण्याचत येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा आदेश लागू करण्यात आला असली तरी अत्यावश्यक सेवांमध्ये येणारी भाजीपाला आणि किराणा दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. शिवाय याचबरोबर या दुकानांमध्ये खरेदी करताना सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या या आवाहनाला ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर या शहरांमधील नागरिकांकडून हरताळ फासण्यात येत असून भाजीपाला आणि फळे खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे करोनाचा धोका अधिकच वाढताना दिसत आहे.

खरेतर अशाप्रकारची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार आवाहन देखील करण्यात आले आहे. मात्र नागरिकांकडून नियम मोडण्यात येत आहेत. अखेर जिल्ह्यातील सर्व शहरांमधील भाजी मंडई तसेच फळे आणि भाजीपाला दुकाने १० एप्रिल रात्री १२ वाजेपासून मंगळवार, १४ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी दिले आहेत. या आदेशानंतरही ही दुकाने सुरु राहिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.