ठाणे जिल्ह्य़ात कोव्हिशिल्ड लशीचा तुटवडा; कालावधी पूर्ण होऊनही लस मिळेना

ठाणे : करोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असला तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर तसेच आसपासच्या शहरांमध्ये कोव्हिशिल्ड लशीच्या तुम्टवडय़ामुळे सलग तिसऱ्या दिवशी स्थानिक प्रशासनाला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. या सर्वच ठिकाणी सुरुवातीच्या काळापासूनच मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेल्या कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा अनेकांनी घेतली असून त्यांचा ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन गेल्यानंतरही त्यांना लस मिळत नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात आला आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत २३ लाख ३ हजार ५१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २१ लाख ९ हजार ६९७ नागरिकांना कोव्हिशिल्ड लस, तर १ लाख ९३ हजार ८२२ नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. सुरुवातीपासून जिल्ह्य़ात कोव्हिशिल्ड लशीचा साठा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाला असून यामुळेच ही लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये कोव्हिशिल्ड लशीचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून यामुळे शहरातील लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर पालिकांकडे कोव्हिशिल्ड लशीचा साठा उपलब्ध नाही. यामुळे या तिन्ही पालिकांनी सलग तीन दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. ठाणे महापालिकेच्या ४० केंद्रांवर मंगळवारी केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती. या लशीचाही साठा संपल्यामुळे आता पालिकेने सर्वच केंद्रे पुन्हा बंद ठेवली आहेत. केंद्र शासनाने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रेतील अंतर वाढवून ८४ दिवसांचे केले. त्याआधी पहिली मात्रा घेऊन ४६ दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या नागरिकांना दुसरी मात्रा दिली जात होती. केंद्राच्या नव्या नियमामुळे नागरिकांना दुसऱ्या मात्रेसाठी ८४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नागरिकांचा हा कालावधी पूर्ण होऊन गेला आहे. तरीही त्यांना कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरी मात्रा मिळविण्यासाठी नागरिक वणवण फिरत असून याबाबत पालिका प्रशासनाकडेही विचारणा करीत आहेत. लससाठा उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासनाकडून उत्तर मिळत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

ग्रामीण भागातही तुटवडा

भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि ग्रामीण क्षेत्रात कोव्हिशिल्ड लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. तसेच नवीन साठा अद्याप तरी उपलब्ध झालेला नाही. ग्रामीण क्षेत्रात दोन हजार कोव्हिशिल्ड लससाठा उपलब्ध होता. तोही गुरुवारी दिवसभरात संपला. त्यामुळे ग्रामीण भागात कोव्हिशिल्ड लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कल्याणमध्ये आठवडय़ातून एकदाच लसीकरण

कल्याण : गेल्या आठवडय़ापासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत लसीकरणाचा पुरेसा साठा केंद्र, राज्य सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने सात दिवसांमध्ये एकाच दिवशी लसीकरण होत आहे. मागील आठवडय़ात सोमवारी लसीकरणाचा एक दिवसाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सहा दिवस सर्व केंद्रे बंद होती. या आठवडय़ात सोमवारी लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली.

सोमवारनंतरलस कुप्यांचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सर्व केंद्रे चार दिवसांपासून बंद आहेत. शासनाकडे सहा लाख कुप्यांची मागणी करण्यात आली आहे, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. लाभार्थी केंद्रचालकांना कार्यालयात जाऊन, भ्रमणध्वनीवर संपर्क करून लस कधी उपलब्ध होईल, अशी सातत्याने विचारणा करत आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने १८ वर्षांपुढील सर्व रहिवासी करोना प्रतिबंधाची लस घेण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी सावित्रीबाई, अत्रे रंगमंदिर, आर्ट गॅलरीतील केंद्रे पाच दिवस सुरू असायची. ती सुविधाही लशीच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे बंद झाली. पालिका हद्दीत एकूण २५ लसीकरण केंद्रे आहेत. त्यांना पुरेसा लस साठा उपलब्ध होत नसल्याने एक दिवसाचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पालिकेला लशीअभावी केंद्रे बंद ठेवावी लागतात. वाढीव लस साठा उपलब्ध झाला तर चाळी, झोपडय़ांमध्ये जाऊन घराघरात, चौकात जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन वैद्यकीय विभागाने केले आहे. दारोदारच्या लसीकरणासाठी पालिकेने दोन व्हॅन सज्ज ठेवल्या आहेत. एक व्हॅनमध्ये लस देण्याचे काम आणि दुसऱ्या व्हॅनमध्ये लाभार्थीना निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी बसण्यास जागा उपलब्ध करून दिली जाईल. अशा प्रकारची यंत्रणा दररोज राबविण्यासाठी पालिकेला दररोज २० हजार कुप्या लागणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.

पालिका हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रे नियमित सुरू ठेवण्यासाठी शासनाकडे सहा लाख कुप्यांची मागणी केली आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने सर्व केंद्रे सुरू ठेवून सर्व वयोगटातील लाभार्थीचे लसीकरण विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. पुरेसा लस साठा उपलब्ध होत नसल्याने सध्या केंद्रे बंद ठेवावी लागतात.

डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी