शेतकरी आत्महत्येप्रकरणी चार वर्षांनी गुन्हा

मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथे राहणारे ६७ वर्षीय अशोक देसले यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नातेवाईकांनी स्वत:ची नावे लावून घेतली होती.

महसूल अधिकाऱ्यासह मृत शेतकऱ्यांचे नातेवाईकही आरोपी

बदलापूर : आपल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर अनावश्यक नातेवाईकांची घुसवण्यात आलेली नावे रद्द करण्यासाठी तहसील कार्यालयाचे खेटे मारणाऱ्या आणि काम होत नसल्याने हतबल झालेल्या अशोक शंकर देसले यांनी १० मे २०१७ रोजी मुरबाड तहसील कार्यालयावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी चार वर्षांनंतर तत्कालीन महसूल अधिकारी आणि मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकावर आत्महत्येस प्रेरित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथे राहणारे ६७ वर्षीय अशोक देसले यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नातेवाईकांनी स्वत:ची नावे लावून घेतली होती. या प्रकरणी अशोक देसले यांनी ही अनावश्यक नावे वगळण्यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही महसूल अधिकारी या अर्ज प्रकरणावर निकाल देत नव्हते. वारंवार अर्ज-विनंती करूनही देसले यांना दाद मिळत नसल्याने त्यांनी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर तत्कालीन महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणी देसले यांच्या मुलाने राज्य मानवी हक्क आयोगाकडे गुन्हा दाखल होण्याकरिता मागणी केली होती. त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्य मानवी हक्क आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायद्याच्या कचाटय़ात कोण?

या आत्महत्येनंतर महसूल विभागाने आपली चूक सुधारत देसले यांच्या अर्जावर निर्णय घेतला होता. मात्र तोपर्यंत अशोक देसले यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यापूर्वीच या प्रकरणावर निर्णय दिला असता तर माझ्या वडिलांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया देसले यांचा मुलगा अनंत देसले यांनी दिली आहे. या प्रकरणी महसूल अधिकारी यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे या चौकशीच्या कचाटय़ात कोण कोण सापडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crime after four years in farmer suicide case ssh

ताज्या बातम्या