ठाणे : गेल्या दीड ते दोन महिन्यांत खूप काही घडामोडी घडल्या असून त्यादरम्यान आम्ही सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली. हंडी कठीण होती; पण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आम्ही ही हंडी फोडली, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केले. या हंडीसाठी ५० थर लावले होते आणि येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल, असे सूचक विधानही त्यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटातून आणखी कोण बाहेर पडणार, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. व्यासपीठावर येताच या वेळचा गोविंदा जोरात आहे ना? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. त्यास गोविंदा पथकांनी जोरदार प्रतिसाद दिला. दहीहंडी आणि नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आनंद दिघे यांनी आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचे काम केले असून तेच काम आजही सुरू आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांची बहीण अरुणा यांनी ही बाब मला बोलून दाखविली होती. दिघे यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. मी मुख्यमंत्री म्हणून इथे उपस्थित राहिलो, हे मी माझे भाग्य समजतो, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांचा जसा आहे, तसाच तो गोविंदाचाही आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गोविंदांना सुट्टी आणि विमा पण दिला. आमदार प्रताप सरनाईक आणि इतर लोकप्रतिनिधींनी दहीहंडीला खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली असून त्याचबरोबर सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळाले आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबड्डीप्रमाणे पुढच्या वर्षी प्रो-गोविंदा होईल, असेही ते म्हणाले.

श्रद्धा कपूरची हजेरी

टेंभीनाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदांशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभीनाक्यावरील दिघेसाहेबांची  दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावले असून त्याचा मला अभिमान असल्याचे तिने सांगितले.