scorecardresearch

कल्याणमध्ये धोकादायक इमारत कोसळली; एक ठार, एक जण जखमी

दोन माळ्याची ही इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमधील रहिवासी अन्यत्र स्थलांतरित झाले होते.

कल्याणमध्ये धोकादायक इमारत कोसळली; एक ठार, एक जण जखमी
कोशे इमारत कोसळताच मोठ्याने आवाज झाला

कल्याण पश्चिमेतील रामबाग विभागात एक अतिधोकादायक इमारत आज (बुधवार) सकाळी कोसळली. या इमारतीत राहत असलेले एक ज्येष्ठ नागरिक कुटुंब इमारतीचा ढिगारा अंगावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे गंभीर दुखापत झालेले एक रहिवासी प्राथमिक उपचार सुरू असताना मरण पावल्याचे घोषित करण्यात आले.

रामबाग विभागात २५ वर्षाहून अधिक वर्षाची कोशे नावाची इमारत आहे. दोन माळ्याची ही इमारत धोकादायक झाल्याने या इमारतीमधील रहिवासी अन्यत्र स्थलांतरित झाले होते. या इमारतीच्या तळ मजला, पहिल्या मजल्यावर कोणीही राहत नव्हते. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर सूर्यभान काकड (५२), उषा काकड (४९) हे कुटुंब राहत होते. ही इमारत धोकादायक झाल्याने पालिकेच्या ब प्रभागातून वेळोवेळी या इमारतीच्या मालकाला इमारतीमधील रहिवासी बाहेर काढण्याच्या, इमारत निष्कासनाच्या नोटिसा दिल्या आहेत, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले. इमारतीचा ढिगारा बाजुच्या घरांवर पडल्याने रज्जाक शेख यांच्या घराचे नुकसान झाले.

पालिका रुग्णालयात डाॅक्टर नसल्याने, खासगी रुग्णालयात न्यावे लागले –

कोशे इमारत कोसळताच मोठ्याने आवाज झाला. परिसरातील रहिवासी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला तातडीने माहिती देण्यात आली. जवान, रहिवाशांनी ढिगाऱ्याखाली अडकलेले काकड कुटुंबीयांना बाहेर काढले. त्यांना इमारतीचा काही भाग अंगावर पडल्याने जखमा झाल्या होत्या. या भागातील रहिवासी जयदीप सानप यांनी तातडीने हालचाली करुन रुग्णवाहिका बोलावून दोन्ही जखमींना पालिका रुग्णालयात नेले. तेथे सूर्यभान यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. उषा काकड यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका रुग्णालयात डाॅक्टर नसल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात न्यावे लागले, असे सानप यांनी सांगितले. पालिका रुग्णालयातील डाॅक्टर ११ वाजता येतात, असे उत्तर सानप यांना देण्यात आले. निवासी डाॅक्टरची सोय पालिका प्रशासनाला रुग्णालयात करता येत नाही का? सामान्य कुटुंबातील रहिवाशांनी अशा परिस्थितीत काय करायचे?, असे प्रश्न यानिमित्ताने केले जात आहेत.

पालिका ब प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर ठाकुर, पालिका तोडकाम पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगारा उपसण्याचे काम पालिका कामगार, जवानांनी सुरू केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या