साहित्यिकांच्या मेळ्यासाठी डोंबिवलीची निवड केल्यावरून कल्याणमध्ये नाराजी; मोठय़ा संस्थांकडून निवडीवर प्रश्नचिन्ह

आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान डोंबिवलीला मिळाल्यानंतर शहरात एकीकडे उत्साहाचे वातावरण असतानाच शेजारील शहर कल्याणातून मात्र टीकेचा सूर उमटू लागला आहे. संमेलनासाठी मूल्यांकनाऐवजी ‘लॉबिंग’ विचारात घेतल्याचा आरोप करत कल्याण सार्वजनिक वाचनालयासारख्या जुन्या संस्थेने संमेलनस्थळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या संमेलनाचे यजमानपद मिळावे यासाठी कल्याण सार्वजनिक वाचनालयाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तसेच समितीला तसे निमंत्रणही पाठविण्यात आले होते. शिवाय महामंडळाच्या निवड समितीसमोर सगळ्या सुविधांची मांडणी करण्यात आली होती. असे असतानाही संमेलन दुसरीकडे वळविण्यामागे नेमके निकष काय आहेत, हे महामंडळाने स्पष्ट करण्याची गरज आहे, असा सवाल कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी केला आहे. संमेलनाच्या ठिकाणाची निवड मूल्यांकनानुसार करण्यात आली की यामागेही काही लॉबिंग आहे, अशी शंकाही त्यांनी मांडली.

कल्याण शहरात दिडशे वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कल्याण सार्वजनिक वाचनालयाकडून पाच वर्षांपासून कल्याणमध्ये साहित्य संमेलन होण्याचे निमंत्रण महामंडळाला दिले जात आहे. साहित्य संमेलनासाठी जंक्शन स्थानक, आचार्य अत्रे रंगमंच आणि बाजूलाच सुभाष मैदानासारखा भव्य मैदान तसेच सार्वजनिक वाचनालय इमारत हे असे सगळे अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे हे ठिकाण सोईचे ठरू शकेल, असा दावा वाचनालयाकडून करण्यात आला होता. शिवाय कल्याणच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमी आणि शहरातील मान्यवर साहित्यिकांचे दाखलेही देण्यात आले होते. महापालिका प्रशासन, शासकीय यंत्रणांबरोबरच कल्याण सार्वजनिक वाचनालय आणि सर्व कल्याणकर या संमेलनाच्या आयोजनात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचेही वाचनालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, रविवारी महामंडळाच्या बैठकीमध्ये डोंबिवली शहराची निवड झाल्यामुळे कल्याणकरांचा हिरमोड झाला आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आवाका लक्षात घेऊनच कल्याण सार्वजनिक वाचनालयाने संमेलनाचे आयोजन करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र स्थळ निवडीचे नेमके कोणते निकष महामंडळाने लावले आहेत, याचे स्पष्ट चित्र समाजासमोर नाही. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येत नसल्यामुळे मंडळाने निवडीचे निकष समाजासमोर ठेवण्याची गरज आहे. ही निवड मूल्यांकनाच्या आधारे होते की, लॉबिंगनुसार हा प्रश्नही सामान्यांना पडत आहे. हे होत असेल तर राजकारणी आणि साहित्यिकांमध्ये फरक राहणार नाही.

राजीव जोशी, अध्यक्ष कल्याण सार्वजनिक वाचनालय्

डोंबिवलीमध्ये संमेलन होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले असून गेल्या वर्षीही डोंबिवली संमेलन आयोजनाच्या शर्यतीत होती. मात्र हे संमेलन पिंपरी चिंचवडला ठरल्यामुळे यंदाचे संमेलन इथे घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात आले आणि त्याला यश मिळाले. डोंबिवलीमध्ये संमेलन होत असून हे सगळ्यांचे संमेलन आहे. कल्याणमधील अनेक नागरिकांनी या संमेलनाच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. लॉबिंग करण्यासाठी संमेलन म्हणजे कोणताही राजकीय कार्यक्रम नाही.

गुलाब वझे, अध्यक्ष आगरी युथ फोरम