निर्बीजीकरणाच्या लसींवर कोटय़वधींचा खर्च, तरीही श्वानांच्या संख्येत वाढ

वसई-विरार शहरात श्वानांचा उपद्रव वाढला असून २०१७ या वर्षांत शहरात तब्बल १० हजार श्वानदशांच्या घटना घडल्याची नोंद महापालिकेने केली आहे. श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी पालिकेला निर्बीजीकरण आणि श्वानदंशावरील लशींसाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत पालिकेने श्वानदंशावरील लशींसाठी १ कोटी ६८ लाख रुपये तर श्वान निर्बीजीकरणासाठीही १ कोटींहून अधिक खर्च केला आहे. कोटय़वधींचा खर्च करूनही श्वानदंशाच्या घटना वाढत असल्याने हा खर्च वाया गेला आहे.

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढलेला आहे. श्वानांमुळे नागरिकांना विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. २०१७ या वर्षांत शहरात तब्बल १० हजार श्वानदशांच्या घटना घडल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. दररोज सरासरी ३० आणि महिन्याला सुमार ९०० श्वानदंशाच्या घटना घडत असतात. श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्या तरी त्यावरील लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र चौहान यांनी सांगितले. पालिकेकडे सध्या नालासोपारा येथे ८० खाटांचे तुळींज रुग्णालय आणि वसईत सर डी. एम. पेटीट अशी दोन रुग्णालये आहेत. याशिवाय २१ आरोग्य केंद्र, नऊ दवाखाने, दोन माता बालसंगोपन केंद्र आहेत. या सर्व ठिकाणी श्वानदशांवरील लशींचा पुरेसा साठा असल्याची माहिती त्यांनी दिली. वाढत्या श्वानदंशाच्या घटनांमुळे श्वानदंशावरील लसींवर पालिकेला खर्च करावा लागात आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेने श्वान लशींसाठी १ कोटी ६८ लाख रुपये खर्च केला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेंतर्गत निर्बीजीकरण करताना श्वानांना अँटीरेबीज लस दिली जाते, तर वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेंतर्गत श्वानदंश झालेल्यांना लस दिली जाते, असे डॉ. चौहान यांनी सांगितले.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांत १० हजार २५५ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. एका श्वानंच्या निर्बीजीकरणासाठी ९९६ रुपये खर्च होते. सध्या पालिकेकडे वसई पूर्वेला नवघर येथे एक श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे. तिथे दररोज १८ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. निर्बीजीकरणासाठी महापालिकेने ३ वर्षांत १ कोटी रुपये खर्च केले आहे.

श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त

श्वानांची संख्या घटवण्यासाठी महापालिका निर्बीजीकरण करत असते, मात्र तरीही श्वानांची संख्या कमी होत नसल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या दप्तरी केवळ ३५ हजार भटक्या श्वानांची नोंद आहे, परंतु प्रत्यक्षात ७० हजारांहून अधिक भटके श्वान शहरात आहेत. रात्री रस्त्यावर श्वानांचे साम्राज्य असते. त्यामुळे वाहनांचे अपघात होतात. रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना श्वानदंश होण्याच्या घटना सर्वाधिक आहेत.