ठाणे : डोंबिवलीतील अमुदान रसायन कंपनीतील स्फोटप्रकरणी कंपनीचा मालक मलय मेहता याला शुक्रवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. तर त्याची आई मालती मेहता हिला चौकशीसाठी पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.

कंपनीत स्फोट झाल्यानंतर मालक मलय मेहता, त्याची आई मालती मेहता यांच्यासह कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष कृती दल आणि खंडणी विरोधी पथकाकडून सुरू होता.

हेही वाचा >>>डोंबिवली स्फोटातील मृतांच्या आकडेवारीवरून गोंधळ

मलय मेहता कोर्टनाका परिसरात न्यायालयीन प्रक्रिया करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी तेथे सापळा रचण्यात आला होता. तो येताच त्याला अटक करण्यात आली.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी इतर दोषींविरोधातही कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.