प्रवाशांची गर्दी आणि वाहनांच्या कोंडीचे आगार ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तब्बल दोन हजार दुचाकी वाहनक्षमतेचे दुमजली वाहनतळ उभारण्याच्या प्रकल्पास अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे.
या वाहनतळाची उभारणी ठाणे महापालिकेमार्फत करण्याचा प्रस्ताव मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने नाकारला होता. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडण्याची चिन्हे असतानाच हे काम स्वखर्चातून करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या कामाचा प्रारंभ दादर स्थानकातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते येत्या सोमवारी दुपारी एक वाजता होणार आहे.
वाहनतळ असा असेल..
पश्चिमेकडील फलाट क्रमांक एकलगत सुमारे १५०० चौरस मीटरच्या भूखंडावर रेल्वे स्वखर्चाने तळ अधिक दोन मजल्यांचा वाहनतळ बांधणार आहे. येथे दोन हजार दुचाकी वाहने उभी करण्याची सोय केली जाईल. वाहनतळाची ही इमारत थेट सॅटीस उड्डाणपुलास जोडली जाणार असून त्यामुळे प्रवाशांना रेल्वे फलाटांच्या दिशेने जाणे अधिक सोयीचे ठरणार आहे. या कामासाठी रेल्वेने सुमारे पाच कोटी ५० लाखांची तरतूद केली असून डिसेंबर २०१६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.