डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

ज्ञानसंवर्धनासाठी वाचन अधिक महत्त्वाचे असते. पुस्तके ही टिकाऊ असतात. अनंत काळ उपलब्ध असतात. बोलण्यातून ज्ञान मिळते. मात्र आपल्या अनुभवांना लेखनातून अधिक आकार मिळतो. लेखनातून ज्ञान आकाराला येत असते. पुस्तकांच्या वाचनामुळे ज्ञान मिळते, कारण ते नियोजित असते. प्रत्येक व्यक्तीला ज्या विषयात रस आहे, त्याप्रमाणे व्यक्ती वाचत असते. संबंधित विषयातील वाचन करण्यासाठी त्या प्रकारचे लेखन असणे आवश्यक आहे. मीसुद्धा वाचन केले, मात्र ते माझ्या विषयाच्या संदर्भात. संशोधनाची आवड असल्यामुळे माझे वाचन विशिष्ट विषयाशी संबंधित राहिले. लहानपणापासून मला नेहमी काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. दरदिवशी नावीन्यपूर्ण काम करायचे होते. त्यामुळे होमी भाभा रिसर्च सेंटरमध्ये असताना अनेक संशोधन पत्रिका वाचल्या. संशोधनाच्या विविध पैलूंचा अभ्यास संशोधन पत्रिकांच्या वाचनामुळे करता आला. अणुशक्तीच्या उपयोगावर वाचन केले. लहानपणी रॉबिन हूड, पेरी मेसन अशी पुस्तके वाचली. मात्र होमी भाभा रिसर्च सेंटरमध्ये आल्यावर वाचनाचा परीघ बदलला.

संशोधकांना वाचताना ज्ञानाची वाटचाल कशी झाली, इतिहास कसा घडला, एखाद्या गोष्टीचे मूल्यमापन कसे झाले याचा अभ्यास करावा लागतो. वैज्ञानिक गोष्टींनाही इतिहास असतो. संबंधित विषयाचा शोध कसा लागला, याचा अभ्यास करण्यासाठी पूर्वीच्या अभ्यासकांचे लेखन वाचणे आवश्यक ठरते. त्यामुळे संशोधन करण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. वाचनात काव्य, कादंबरी, कथा, ललित, नाटय़ असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकार समाजात व्यक्तीच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून तयार होत असतात. घटना सारख्या असल्या तरी मांडण्याची कला मात्र वेगळी असते. याचमुळे लेखन आणि वाचन समाजाचा अविभाज्य घटक असतो. समाजातूनच वैविध्यपूर्ण लेखनाचा जन्म होतो. आण्विक संशोधनामध्ये मला वाचनाची अधिक सवय लागली. काल जे केले ते आज नको. ही जाणीव होती. नवीन काही करायचे तर तयारी करणे आवश्यक होते. तयारी करण्यासाठी मदत झाली ती संशोधन पत्रिकांची. आपल्या सहकाऱ्याने काही नवीन केले तर त्यांच्या कामाचे, अनुभवांचे वाचन करण्याची सवय लागली. माझे साहित्यविश्व या विज्ञानाच्या परिघात बंदिस्त आहे. ज्या क्षेत्रात संशोधन करायचे आहे त्या अनुषंगाने माझे वाचन होत गेले. इतरांनी काय केले ते अभ्यासण्यासाठी मी वाचतो. मी नेमके काय केले हे समाजाला सांगण्यासाठी मी वाचतो. अणुशक्तीचे उपयोग, अणुशक्तीबाबत लोकांचे मत, अणुशक्तीच्या वापराविषयीची चांगली मते, वाईट मते याबाबत वाचन केले. सर्व साहित्य प्रकार मी वाचतो असे मात्र होत नाही. मात्र संदर्भासाठी नक्कीच वाचतो. नवनवीन लेखक आण्विक संदर्भात जे लिखाण करतात त्या लिखाणाचे वाचन करतो. ‘ज्ञानोबांचे अर्थशास्त्र’ हे डॉन फिझोट यांचे पुस्तक वाचले. झिंकोवीट्सची काही पुस्तके वाचली. विज्ञानाच्या संदर्भात वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारे लेख वाचतो. महात्मा गांधी, टिळकांविषयी वाचले. त्या परिस्थितीत ही मंडळी कशी जगली, एखाद्या समस्यांवर त्यांनी कसे तोडगे काढले हे जाणून घेण्यासाठी वाचले. पं. नेहरूंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ वाचले. माझ्यासाठी पुस्तकांचा खरा उपयोग म्हणजे संदर्भासाठी होतो. सध्या मी हेन्री किसीन्जर यांचे ‘वर्ल्ड ऑर्डर’ हे पुस्तक वाचत आहे. तंत्रज्ञानाची कास वाचकांनीही धरायला हवी. तंत्रज्ञानाबाबत जागरूकता साहित्यातही उतरेल. याचे कारण असे की आधी अनुभव मिळतो, मग हे साहित्यात उतरते. आज जे काही वाचतो आणि ज्याचे मनन करतो.