एकाच इमारतीमधील चार जणांच्या घरात मीटरशिवाय सेवा
ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आणि मुंब्य्रातील नगरसेवक राजन किणे यांनी वीजचोरी केल्याची बाब महावितरणच्या कारवाईतून बुधवारी उघडकीस आली आहे. सुमारे चार लाखांची थकबाकी असल्यामुळे महावितरणने त्यांचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे विजेच्या खांबावर आकडा टाकून ते विजेची चोरी करत होते. महावितरणच्या कारवाईमध्ये दीड लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले असून ही रक्कम भरण्यासाठी महावितरणने नोटीस बजावून किणे यांना एक दिवसांची मुदत दिली आहे. ही रक्कम न भरल्यास महावितरणच्या कल्याण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते राजन किणे आनंदनगर कोळीवाडा येथील जास्मीन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांच्या घरी होणाऱ्या वीज पुरवठय़ाची सुमारे ३ लाख ९८ हजारांची थकबाकी होती. त्यामुळे राजन किणे यांचे वडील नारायण किणे यांच्या नावे असलेला वीज मीटर खंडित करण्यात आला होता. बुधवारी दहा महिन्यांनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीमध्ये छापा घातला. त्यावेळी या इमारतीमधील किणे यांच्या घरात मीटरशिवाय थेट खांबावर आकडा टाकून वीजपुरवठा सुरू असल्याचे निदर्शनात आले. तीन वातानुकूलित यंत्र, टीव्ही, फ्रीज, पंखे यासाठी ही वीज वापरली जात होती. दहा महिन्यात त्यांनी १ लाख ५१ हजारांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी महावितरणच्या पथकाने किणे यांना पुढील २४ तासामध्ये थकबाकी भरण्याची रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत.