कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रकार; नऊ अभियंत्यांचा आक्षेप

भगवान मंडलिक

कल्याण: कल्याण-डोंबिवली पालिकेतील अभियांत्रिकी, स्थापत्य अभियंते म्हणून काम करणाऱ्या ११ उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांनी परराज्यातील दूरस्थ शिक्षण विद्यापीठांमधून पदवी (बॅचलर ऑफ टेक्नॉलाजी, इंजिनीअिरग) घेतली आहे. या पदव्यांना पालिकेतील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून अभियांत्रिकीच्या पदवी घेतलेल्या सक्रिय नऊ अभियंत्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे दूरस्थ विद्यापीठांमधून पदवी घेतलेल्या अभियंत्याच्या पदव्या चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने ११ अभियंत्यानी पदवी घेतलेल्या दूरस्थ तंत्रज्ञान विद्यापीठांना त्या राज्यांमधील तंत्रज्ञान शिक्षण संचालकांची परवानगी आहे का तसेच या पदव्यांची वैधता या अनषुंगाने तपास सुरू केला आहे. स्थापत्य, अभियांत्रिकी शिक्षणात प्रात्यक्षिक महत्त्वाची आहेत. हे शिक्षण दूरस्थ पद्धतीने देता येऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात यापूर्वी व्यक्त केले आहे. हा संदर्भ आम्ही प्रशासनासमोर मांडला आहे, असे तक्रारदार अभियंत्यांनी सांगितले. या पदव्यांच्या आधारे या अभियंत्यांना बढती  देऊ नये, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटी, राजस्थान विद्यापीठ, उदयपूर, मानव भारती सलोन, हिमाचल प्रदेश, जनार्दन राय राजस्थान विद्यापीठ या दूरस्थ विद्यापीठांमधून अभियंत्यांनी पदव्या घेतल्या आहेत. सन २०१० ते २०१६ हा पदवी घेण्याचा काळ आहे. सहा उपअभियंते, तीन कनिष्ठ अभियंते आणि दोन पर्यवेक्षक यांचा पदव्या घेणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

दूरस्थ विद्यापीठातून पदव्या (बी.ई., बी.टेक) आणलेल्या अभियंत्यांनी ‘डिप्लोमा इन कन्सट्रक्शन टेक्नॉलॉजी’, ‘डिप्लोमा इन सिव्हील इंजिनीअर’, ‘बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स’, ‘डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल इलेक्ट्रिक’, ‘सिव्हील इंजिनीअिरग डिप्लोमा’ असे पदविका कोर्स यापूर्वी केले आहेत. या अभियंत्यांचे शिक्षण इयत्ता दहावी, बारावीपर्यंत आहे, असे पालिका सेवा ज्येष्ठता यादीत नमूद आहे. दूरस्थ पदवी घेणाऱ्या अभियंत्यांमध्ये प्रवीण पवार, सुनील महादलेकर, किरण वाघमारे, दिलीप खरे, भालचंद्र नेमाडे, बबन बरफ , तुकाराम संख्ये, बाजीराव अरगडे या पर्यवेक्षकांचा (डी. सी. ई.) समावेश आहे.

अधिसंख्य अभियंते

पालिकेतील चार अभियंत्यांनी जातीचे बनावट प्रमाणपत्र दाखल करून नोकरी मिळवली. हे अभियंते वैध जातप्रमाणपत्र पालिकेत दाखल करू शकले नाहीत. अशा चार अभियंत्यांच्या सेवा सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निर्णयानुसार पालिकेने अधिसंख्य (कंत्राटी) पदावर वर्ग केल्या आहेत. वैध जात प्रमाणपत्र दाखल न करणाऱ्या उदय सूर्यवंशी, शिवप्रसाद मुराई, सुरेंद्र टेंगळे, सुनील वैद्य यांना अधिसंख्या पदावर वर्ग केले आहे.

लाच अधिकाऱ्यामुळे प्रकरण उजेडात

सप्टेंबरमध्ये डोंबिवलीत पालिकेच्या ‘फ’ प्रभागात सुनील वाळंज हा कनिष्ठ अभियंता दीपक शिंपी प्लम्बरकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकला. वाळंज यांची शैक्षणिक पात्रता, त्यांची बढती याविषयी माहिती कार्यकर्ते मकरंद माडखोलकर यांनी पालिकेतून काढली. वाळंज यांचे शिक्षण दहावी, आयटीआय, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कोर्स, दूरस्थ विद्यापीठाची डिप्लोमा इन सिव्हील इंजिनीअिरग (डी.सी.ई.) पदवी त्यांच्याकडे आहे. या डी. सी. ई. पदवीला सेवा ज्येष्ठता यादीत हरकत नोंदविण्यात आली आहे. या विषयावरून दूरस्थ विद्यापीठातून किती अभियंते पदवी प्राप्त आहेत याची माहिती ‘लोकसत्ता’ने मिळवली. त्यानुसार ११ उप, कनिष्ठ अभियंत्यांनी अशा पदव्या मिळविल्याचे कागदोपत्री दिसून आले.

दूरस्थ विद्यापीठातून पदवी घेतलेल्या अभियंत्यांच्या पदव्यांना पालिकेतील काही अभियंत्यांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर सुनावण्या सुरू आहेत. पदवी प्राप्त अभियंत्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. संबंधित विद्यापीठांना त्या राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाची परवानगी आहे का, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, या पदव्यांची वैधता तपासली जाणार आहे.

सुनील पवार, अतिरक्त आयुक्त, कडोंमपा