बनावट ‘आधार’, ‘पॅन’ बनवणारी टोळी गजाआड

आधारकार्ड, पॅनकार्ड ही अत्यंत महत्त्वाची शासकीय दस्तावेज मानले जातात.

बोगस ओळखपत्रे अ‍ॅपद्वारे बनवून देणारी टोळी कार्यरत असून आधारकार्ड, पॅनकार्ड आदी महत्त्वाची ओळखपत्रे पाच मिनिटांत बनवून मिळत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १३ मे रोजी प्रसिद्ध केले होते.

‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर पोलिसांची कारवाई; ऑनलाइन अ‍ॅप्सद्वारे २०० रुपयांत ओळखपत्रांची निर्मिती

इंटरनेटवरील अ‍ॅपद्वारे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, पारपत्र आणि इतर कागदपत्रे बनवणाऱ्या तिघांना नालासोपारा येथे छापा टाकून पोलिसांनी अटक केली. अ‍ॅपद्वारे ही टोळी अवघ्या २०० रुपयांत कोणतेही ओळखपत्र बनवून द्यायची. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

आधारकार्ड, पॅनकार्ड ही अत्यंत महत्त्वाची शासकीय दस्तावेज मानले जातात. अत्यंत सखोल तपासणी केल्यानंतर अधिकृत नागरिकांना ती दिली जातात. मात्र इंटरनेटवर ही कागदपत्रे बनवणाऱ्या विनामूल्य अ‍ॅपचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १३ मे रोजी  दिले होते. त्याची दखल घेत वसईच्या उपअधीक्षकांनी संगणाकाचा वापर करून अशी बनावट ओळखपत्रे बनवणारी टोळी कार्यरत आहे का त्याचा तपास करण्यास सुरुवात केली होती. मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाने नालासोपारा पूर्वेच्या गोकुळ अपार्टमेंटमधील ‘छाया डिजिटल फोटो स्टुडियो’ येथे छापा टाकला. यावेळी बनावट ११ आधारकार्ड, १२ पॅनकार्ड, ५ वाहन परवाना, ते बनवण्यासाठी लागणारे कागद, संगणक इत्यादी साहित्य जप्त केले. या वेळी पोलिसांनी मनोज प्रजापती (२८), रंजित मंडल (२८) आणि रामसिंग राजपूत (४२) या तिघांना अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून ते बनावट कार्ड आणि परवाने बनवत असल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोनशे रुपयांत आधारकार्ड, पॅनकार्ड आणि वाहन परवाना बनवून दिला जात होता, असे पोलिसांनी सांगितले. आधारकार्ड आणि वाहनपरवाना हा कुणाच्याही नावाने बनावट बनवून दिला जात होता, तर पॅनकार्ड हा कुठल्याही मूळ पॅनकार्डचा क्रमांक टाकून बनवला जात होता, असे वसईचे विभागीय

पोलीस उपअधीक्षक अनिल आकडे यांनी सांगितले. या टोळीत आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि किती जणांना त्यांनी असे परवाने बनवून दिले आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fake pan card and aadhar card crime

ताज्या बातम्या