घरात जेव्हा केव्हा चिकन बनते, तेव्हा सगळ्यांच्या तोंडून एकच स्वर ऐकू येतो, तो  म्हणजे ‘लेग पीस मला हवा’ किंवा ‘तंगडी मला हवी’. आता त्याबाबत चिंता करायचे कारण नाही. घरातल्या सर्वासाठी खास तंगडीचा बेत ठाण्यातील पोखरण रोडवरील ‘चिकन तंगडी.कॉम’ने उपलब्ध करून दिला आहे. हल्ली बाजारात विविध परदेशी फूड चेन शिरकाव करूलागली आहे. मात्र तरीही देशी पदार्थाच्या चवीला तोंड देणे त्यांना जमणार नाही. भारतीय पद्धतीने बनवलेले घरगुती चव असणारे चिकन तंगडीचे विविध प्रकार तुम्हाला येथे चाखायला मिळतील.
‘चिकन तंगडी.कॉम’चे वैशिष्टय़ असे की, येथे केवळ कोंबडीची ‘तंगडी’च मुख्यत: सर्व पदार्थामध्ये वापराली जाते. दोन ते अडीच किलो वजनाच्या कोंबडीच्या तंगडीचा वापर येथील पदार्थामध्ये केला जातो. चिकन शिजविण्यासाठी जर पाण्याचा वापर केला, तर काही प्रमाणात ते रबरी किंवा ताठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे तंगडी पूर्णपणे वाफेवर शिजवून त्यामधील उग्रपणा घालविल्यानंतरच देशी मसाल्यांचा वापर करून येथे पदार्थ बनविले जातात. येथील वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही प्रकारचे रसायन किंवा रंग न वापरता येथे पदार्थ बनविले जातात. आपल्याला चटकदार खानदेशी कोंबडीची चव येथे चाखायला मिळणार आहे. येथे स्नॅका तंगडी हा प्रकार अतिशय लोकप्रिय आहे. तसेच कुरकुरीत ‘क्रिस्पी तंगडी’ ही सर्व बच्चे कंपनीच्या आवडीची मानली जाते, तसेच अस्सल खानदेशी पद्धतीने बनविला गेलेला ‘चिकन चकना’ही येथे उपलब्ध आहे. तसेच चिकन खिमा वापरून ‘चिकन समोसा’ हा एक आगळा-वेगळा पदार्थ येथे आपल्याला मिळेल. लहान मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेता ‘चिकन नगेट्स’ आणि ‘चिकन पॉपकॉर्न’ म्हणजे चिकनचे तळलेले लहान लहान तुकडे. हे पदार्थ लहान मुलांच्या सर्वात आवडीचे मानले जातात. त्याचप्रमाणे चिकन करी, तंगडी करी असे रश्शाचे प्रकार येथे उपलब्ध आहेत. खास तुमच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी ‘चुलीवरील चिकन करी’ आणि ‘चुलीवरील तंगडी करी’ हे दोन रश्शाचे खास पदार्थ केवळ बुधवार आणि रविवार हे दोन दिवसच येथे उपलब्ध असतात. भाताशिवाय आपले जेवण पूर्ण होत नाही, असे म्हणतात. सर्वसाधारणपणे बिर्याणीमध्ये चिकनचे लहान लहान तुकडे असतात. येथील बिर्याणीमध्ये मात्र फक्त तंगडी वापरली जाते. त्याचप्रमाणे येथे पूर्ण मांसाहारी जेवण उपलब्ध आहे. भविष्यात तंदूर पद्धतीने तंगडीचे विविध पदार्थ बनविण्याचा त्यांचा मानस आहे.
‘घरची चव’ देण्याचा उद्देश
समीर माचवे, अर्चना माचवे आणि उपेंद्र बोरवले यांनी मिळून सर्वप्रथम ‘चिकन तंगडी.कॉम’ नाशिक येथे सुरू केले. खवय्यांचा वाढता प्रतिसाद पाहता त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ही चव पोहचविण्याचा विचार केला. हा व्यवसाय करण्यामागे खवय्यांना ‘घरची चव’ देणे हा एकमेव उद्देश आहे. तीन वर्षांपूर्वी माचवे यांनी नाशिक येथे पहिले दुकान थाटले. त्यानंतर, वाढता प्रतिसाद पाहता नाशिकबरोबरच पुण्यालाही त्यांनी शाखा सुरू केली. ठाण्यातील शाखेचे मालक राहुल सूर्यवंशी यांनी खास ठाणेकरांना खानदेशी पद्धतीच्या मांसाहाराची चव कळावी यासाठी सहा महिन्यांपूर्वी पोखरण रोडजवळ चिकन तंगडी.कॉमची शाखा सुरूकेली आहे. आता ठाण्यासोबतच मुंबई आणि परदेशातही ही मराठमोळी चटकदार चिकन तंगडी पोहचणार आहे, अशी माहिती चिकन तंगडी.कॉमच्या ठाणे शाखेचे मालक राहुल सूर्यवंशी यांनी दिली.
शलाका सरफरे
चिकन तंगडी.कॉम
स्थळ : शॉप क्र. ९/१०, स्वस्तिक प्लाझा, स्वस्तिक गार्डन, व्होल्टास बस स्टॉप, पोखरण रोड क्र.२,
माजिवाडा, ठाणे (प)