एसटीचा संप टीएमटीच्या पथ्यावर; ठाणे मनपा परिवहनच्या तिजोरीत तीन लाखांची वाढ

ठाण्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे बोरिवली, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण व्हावे आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी दैना उडाली असून अनेक प्रवाशांनी एसटीला पर्याय शोधत रेल्वेची कास धरणे पसंत केले. ठाणे रेल्वे स्थानकात तिकिटासाठी झालेली प्रवाशांची गर्दी. (छाया : दीपक जोशी)

ठाणे मनपा परिवहनच्या तिजोरीत तीन लाखांची वाढ

ठाणे: कामगारांच्या संपामुळे राज्य परिवहन मंडळाला आर्थिक फटका बसत असताना, हा संप ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) पथ्यावर पडला आहे. एसटी वाहतूक बंद असल्याने बोरिवली, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा या मार्गांवर टीएमटीने ३० जादा फेऱ्या वाढवल्या आहेत. या बसगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याद्वारे टीएमटीच्या उत्पन्नात तीन लाखांची भर पडली आहे.

मागील दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे बोरिवली, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा मार्गावर एसटीची एकही गाडी धावलेली नाही. या मार्गावर नागरिकांना प्रवास करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आणि ठाणे परिवहन सेवेच्या टीएमटी गाड्या मोठ्या प्रमाणात सोडण्यात येतात. बहुतांश नागरिकांचा कल या बसगाड्यांतून प्रवास करण्यावर असतो. राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

ठाण्यातील एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे बोरिवली, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी, प्रवाशांच्या मागणीनुसार या मार्गांवर धावणाऱ्या टीएमटीच्या फेऱ्यांमध्ये ज्यादा ३० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी संख्येत १५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून टीएमटीच्या उत्पन्नात तीन लाखांनी वाढ झाली आहे.

दर दिवसाला ठाण्याहून बोरिवली मार्गावर जाण्यासाठी साध्या ५२ आणि वातानुकूलित ३२ बसगाड्या धावत असतात. मागील दोन दिवसांमध्ये यामध्ये १० गाड्या जादा सोडण्यात येत आहेत. ठाणे-मीरा रोड मार्गावर दिवसाला ४० बसगाड्या सोडण्यात येत असून प्रवाशांच्या मागणीनुसार यामध्ये १० जादा गाड्या सोडण्यात येत आहेत, तर भाईंदर मार्गावर १० बसगाड्यांमध्ये आणखी ४ गाड्या वाढवण्यात आल्या असल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेच्या व्यवस्थापकांनी दिली. एकंदर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे टीएमटी  चा मोठा लाभ होत आहे.

एसटी महामंडळाच्या संपामुळे ठाण्याहून बोरिवली, मीरा-भाईंदर आणि नालासोपारा या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढल्याने ठाणे परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या फेऱ्यांमध्ये जादा ३० फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे

– शशिकांत धात्रक, प्रभारी परिवहन उपव्यवस्थापक, ठाणे परिवहन सेवा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Financial blow to the state transport board tmt good response from passengers akp

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या