वसईची अग्निसुरक्षा वाऱ्यावर

एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते.

fire fighting machinery
प्रतिनिधिक छायाचित्र

बहुतांश इमारतींचे ‘फायर ऑडिट’ नाही; शाळा, रुग्णालये, मॉल यांनाही अग्निधोका

वसई-विरार शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील एकाही खासगी आणि सार्वजनिक आस्थापनांचे अग्निसुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) झालेले नाही. विशेष म्हणजे शाळा, रुग्णालये, मॉल, सरकारी कार्यालये या सर्वसामान्य लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणीही अग्निसुरक्षा परीक्षण झाले नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते.

गेल्या आठवडय़ात वसई पूर्वेच्या औद्य्ोगिक वसाहतीत लागलेल्या आगीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले होते. या आगीनंतर अग्निसुरक्षा परीक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. वसई-विरारमधील बहुतांश इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षण झालेले नाही. महापालिकेकडे सहा अग्निशमन केंद्रे असून एकूण २३२ कर्मचारी आणि अग्निशमन जवान आहे. १६ चार चाकी वाहने असून ७ अग्निशमन दुचाक्या आहेत. पालिकेच्या अग्निशमन विभागाने अग्निसुरक्षा परीक्षण करण्यासाठी नोटिसा पाठवलेल्या आहेत. मात्र त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

आग लागू नये म्हणून खबरदारी घेतलेली आहे का, आग लागल्यास सुरक्षित सुटकेसाठी मार्गात अडथळे आहेत का, अग्निरोधक यंत्रे सुस्थितीत आहेत का, तेथील कर्मचाऱ्यांना ही अग्निरोधक यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे का या सर्व बाबी तपासून संबंधीत इमारतीला अग्निसुरक्षा परीक्षण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते.

सध्या पालिकेच्या एकाच मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना अग्निसुरक्षा परीक्षण करण्याचे अधिकार आहेत. खाजगी इमारतींचे अग्निसुरक्षा परीक्षण झालेले नाही, परंतु खुद्द पालिकांच्या इमारती आणि रुग्णालयांचेही अग्निसुरक्षा परीक्षण झाले नसल्याचा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे.

पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

सहा उपकेंद्रे

वसई-विरार महापालिकेचे मुख्य अग्निशमन केंद्र नालासोपाऱ्यात आचोळे येथे आहे, तर एक उपकेंद्र सनसिटी गास रस्त्यावर आहे. शहरात कुठेही आग लागली तर वेळेवर पोहोचता यावे यासाठी पालिकेने अधिक उपकेंद्रे मंजूर केली आहेत. पेल्हार, वालीव, बोळींज, नवघर पूर्व, वसई गाव आणि उमेळा येथे ६ अत्याधुनिक उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. पालिकेने ही उपकेंद्रे मंजूर केली असली तरी त्याातील काही उपकेंद्रांना आरक्षित जागेचा फटका बसला आहे. जूचंद्र येथील उपकेंद्र हे सीआरझेड कायद्यामुळे रद्द करावे लागले आहे.

वसई-विरार महापालिकेची अग्निशमन यंत्रणा अत्याधुनिक आणि सुसज्ज आहे. मुंबई महापालिकेकडेही नसलेल्या ‘फायर बाईक’ वसई-विरार महापालिकेकडे आहेत. महापालिकेने उपकेंद्रे मंजूर केली असून ती उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

भरत गुप्ता, सभापती, अग्निशमन विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire safety issue in vasai