एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

अंबरनाथ : दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करून घरी परतणाऱ्या उल्हासनगरच्या चौघांवर काळाने घाला घातला आहे, तर चौघे जखमी झाले आहेत. अंबरनाथ पूर्वेतील पाले गावाच्या हद्दीत वालधुनी नदीच्या प्रवाहात गणपती विसर्जन करून परतणाऱ्या एका रिक्षाला चारचाकीची जोरदार धडक बसली. यात तीन प्रवासी आणि रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

अंबरनाथ पूर्वेत पाले गावाच्या शेजारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नवे औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित आहे. त्यामुळे या भागात रस्ते आणि भूखंडांची आखणी केली जाते आहे. या भागाला लागून वालधुनी नदीचा प्रवाह आहे.

रविवारी या प्रवाहात गणपती विसर्जनासाठी उल्हासनगरातील वर्षा जगदीश वलेचा (५२), आरती सुनीलकुमार वलेचा (४२), राज दीपक कुमार वलेचा (१२), लहेर सुनीलकुमार वलेचा (१०) रिक्षाने गेल्या होत्या.

विसर्जन करून परतताना चारचाकीने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यात वर्षा, आरती, राज आणि रिक्षाचालक किसन शिंदे (२४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहेर वलेचा गंभीररीत्या जखमी झाली.

चारचाकीचा चालक निनाद यादव, मालक सुदाम भांगरे आणि संतोष भांगरे हे जखमी झाले आहेत. मृतांना आणि जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.