महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या वेगवेगळय़ा नियमांचा फटका

गोव्याच्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतलेले आणि नायगाव येथे राहणारे स्वातंत्र्यसैनिक हरिन्द्रनाथ शेट्टी गेल्या ४५ वर्षांपासून निर्वाहवेतनापासून (पेन्शन) वंचित आहेत. मूळ गाव कर्नाटकात असलेल्या आणि गेल्या ५० वर्षांपासून महाराष्ट्रात नायगाव येथे राहत असल्याने सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी दोन्ही राज्याचे सरकार डावलत आहेत. या दोन्ही राज्याच्या वेगवेगळ्या नियमांमुळे मधल्या मध्ये या स्वातंत्र्यसैनिकाचे मरण होत असून सध्या त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

हरिन्द्रनाथ शेट्टी (८०) हे गेली ५० वर्षे वसईत राहत आहेत. यांचे मूळ गाव कर्नाटक येथील. शेट्टी यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी वयाच्या १९ व्या वर्षी सत्याग्रहासाठी म्हणून त्यांची तुकडी मंगलोरहून बांदामार्गे सारवोळीकडे जाण्यास निघाली त्यांच्या २३ जणांच्या तुकडीचे मंगलोरचे कम्युनिस्ट कार्यकर्ते बी काकलिया हे नेते होते. त्यांच्याबरोबर देशाच्या इतर भागांतून विविध पक्षांतर्फे आलेले सत्याग्रहीदेखील होते. त्या सर्वांचे तीन गट करून त्यांना वेगवेगळ्या छावणीत पाठविण्यात आले. १५ ऑगस्टच्या पहाटेच त्यांनी गोव्याच्या दिशेने कूच केले. यावेळी पोर्तुगीज सैनिकांनी या सत्याग्रहींवर हल्ला केला आणि त्यांना बेदम मारण्यास सुरुवात केली. रायफलीच्या दस्त्यानी केलेल्या प्रहारामुळे शेट्टींचे डोके फुटले आणि ते रक्तबंबाळ झाले. काकलिया यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यातून त्यांना वाचवण्यासाठी त्याच स्थितीत शेट्टींनी आपला उजवा हात मध्ये घातला. यामध्ये त्यांच्या मनगटाचे हाड मोडले. पोर्तुगीज सैनिकांनी त्यांना बाजूच्या नाल्यात फेकून दिले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. जखमा बऱ्या झाल्यानंतर ते आपल्या गावी गेल्याचे शेट्टी म्हणाले.

काही वर्षांनंतर ते उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. छोटी-मोठी कामे करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. १९८६ साली झालेल्या मोटार अपघातानंतर त्यांची नोकरी गेली. गोवा मुक्ती आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना मानधन आणि निर्वाह वेतन मिळणार असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी या पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. यासाठी त्यांनी सत्याग्रहाच्या वेळचे नेते काकलिया यांचे शिफारसपत्र आणि सत्याग्रहात सहभागाचे डोक्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेतील शेट्टींचे फोटो अर्जासोबत जोडले, पण तरीही त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर १९९० मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे यासाठी अर्ज करण्यासाठी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडून पत्र लिहून आणले होते, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकारकडे शेट्टी फेऱ्या मारतच होते, पण त्यांना कोणीच दाद घेत नव्हते. १९९१मध्ये या संदर्भात पंतप्रधानांना ही त्यांनी पत्र लिहिले होते.

जबाबदारी घेणार कोण?

शेट्टी यांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडे अनेकदा फेऱ्या मारल्या. रीतसर पुरावे देऊनही काहीच झाले नाही. शेट्टींनी कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांना

समजले की, कर्नाटकात स्थायिक न झाल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे.  महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधला असता मंगलोर येथून निघालेल्या सत्याग्रहींच्या तुकडीबरोबर सत्याग्रह केल्यामुळे त्यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधावा, असा सल्ला त्यांना देण्यात आला. या दोन्ही राज्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या एकमेकांवर ढकलल्याने त्यात माझे नुकसान झाल्याचे शेट्टी म्हणाले. ‘मी भारताचा नागरिक आहे. मात्र हे या दोन्ही राज्यांच्या सरकारला पुरेसे नसून मी नेमक्या कोणत्या राज्याचा हे त्यांना पटवून देण्यात सध्या मी व्यग्र आहे,’ अशी व्यथा शेट्टींनी मांडली.