ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर महापालिकांसह बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने या सर्वच ठिकाणी प्रशासकीय राजवट लागू झालेली आहे. त्यापाठोपाठ आता येत्या पंधरा दिवसांत भिवंडी महापालिकेची तर, अडीच महिन्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात येणार आहे. पावसाळय़ात निवडणुका होणार नसल्यामुळे पुढील काही महिने संपूर्ण जिल्हाच प्रशासकीय राजवटीखाली राहणार असल्याचे चित्र दिसून येते.
ठाणे जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिकांची पंचवार्षिक मुदत वेगवेगळी आहे. वेळेत निवडणुका होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत पालिकांवर प्रशासकीय राजवट लागू झालेली नव्हती. दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेची तर दीड वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेची मुदत संपुष्टात आली. परंतु करोना संकटामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. करोना प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन पूर्वपदावर आले असले तरी ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. या ठिकाणी प्रशासकीय राजवटीखाली शहराची विकासकामे सुरू आहेत. या महापालिकांपाठोपाठ बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांची पंचवार्षिक मुदत दोन वर्षभरापूर्वी संपुष्टात आली असून या ठिकाणीही प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेची काही महिन्यांपूर्वी पंचवार्षिक मुदत संपली असून या ठिकाणी महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून पालिकेचे कामकाज पाहात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पावसाळ्यानंतर हिरवा कंदील दाखविला आहे.
जिल्ह्यातील भिवंडी आणि मिरा-भाईंदर महापालिका वगळता उर्वरित जिल्ह्यात प्रशासकीय राजवट लागू असतानाच, आता ५ जूनला भिवंडी महापालिकेची तर, अडीच महिन्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात येणार असल्याने या ठिकाणीही प्रशासकीय राजवट लागू होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रशासकीय राजवट
महापालिका प्रशासकीय राजवट
लागू तारीख
ठाणे ६ मार्च २०२२
कल्याण-डोंबिवली १२ नोव्हें.२०२०
नवी मुंबई ८ मे २०२०
उल्हासनगर ४ एप्रिल २०२२
कुळगाव बदलापूर १९ मे २०२०
अंबरनाथ १९ मे २०२०