शिल्पकार साठे यांचे मत

सत्य, अहिंसा, साधी राहणी याद्वारे महात्मा गांधींनी जगाला सत्शीलपणे जगण्याचा आदर्श मार्ग दाखवून दिला. सध्याच्या काळातही त्यांचा विचार महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी ते समजावून घेऊन त्यानुसार आचरण करायला हवे. केवळ शैक्षणिक गुणवत्ता आत्मसात न करता त्यासोबत सामाजिक बांधीलकी, सदाचार या गोष्टी विद्यार्थ्यांनी जपायला हव्यात, असे मत सुप्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या वतीने आयोजित गांधी महोत्सवात व्यक्त केले.

आधुनिकता, जागतिकीकरण, शहरीकरण या संकल्पनांना नैतिकता प्राप्त करून देण्यासाठी तरुणांमध्ये महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव असणे गरजेचे आहे. या उद्दिष्टाने गांधी जयंतीचे औचित्य साधून कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात तीन दिवस गांधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी महाविद्यालयामध्ये गांधी महोत्सवाला प्रारंभ झाला. शिल्पकार सदाशिव साठे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. वस्त्र निर्मिती आणि त्यापासून रोजगार निर्मिती या गांधींच्या विचारांचे आचरण विद्यार्थ्यांनी करावे यासाठी महाविद्यालयातर्फे काही गांधी प्रतीके आणण्यात आली आहेत. त्यापैकी चरखा चालवून सदाशिव साठे यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले.