लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्वेत गोळीबार प्रकरणामुळे तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती भाजप कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्व भागात आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेऊन कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याचा आणि भाजपचा उमेदवार आणि कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचाच प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तशा आशयाचा प्रस्ताव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कल्याण पूर्वेत भाजप, शिवसेनेत बेबनाव निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. निर्णय घेणारे हे आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते किंवा भाजप कार्यकर्ते नसून ते गुंड प्रवृत्तीचे लोक महायुतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी अशाप्रकारची भूमिका घेत असल्याची टीका शनिवारी खासदार शिंदे, जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी केली होती.

आणखी वाचा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाची उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाची शिंदेवर टीका

आमदार गायकवाड यांची कल्याण पूर्वेत लाखाहून अधिक मते आणि त्यांचे समर्थक आहेत. ही मते महायुतीच्या उमेदवाराला पडली नाहीत तर मोठी गडबड होऊ शकते हा विचार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधून आमदार गायकवाड समर्थकांशी रविवारी संवाद साधला. त्यांची भूमिका ऐकून घेतली. आपणास नरेंद्र मोदी यांचा पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. राष्ट्र विचार हा भाजपमध्ये प्रथम आहे. त्यानंतर पक्ष आणि व्यक्ति विचार आहे, असे पटवून सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत व्यक्तिगत हेवेदावे बाजुला ठेऊन भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करायचे आहे, असे आमदार गायकवाड समर्थकांना मंत्री चव्हाण यांनी पटवून सांगितले. त्यानंतर गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी काम करण्याचा निर्धार मंत्री चव्हाण यांच्या समोर व्यक्त केला आहे.

या निर्णयामुळे कल्याण पूर्व भागात आता कोणत्याही प्रकारचा शिवसेना, भाजप युतीत तणाव राहिलेला नाही. एकजुटीने या भागात कार्यकर्ते शिंदे यांचे काम करतील, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. शिवसेनेचे युवा नेते दीपेश म्हात्र यांनी आमदार गणपत गायकवाड यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी शनिवारी केली होती. त्यावेळी त्यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे आणि त्यांचे नेते त्यांना योग्य ती समज देतील, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे

आमदार गणपत गायकवााड हे आमचे नेते आहेत. त्यांना आमचे शंभर टक्के समर्थन आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या विषयी आपलेपणा वाटणे सहाजिकच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दोन दिवसात काही भूमिका शिंदे यांच्या विषयी घेतली होती, ती आता निवळली आहे. कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त करणे काही गैर नाही, असे जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

गेल्या दोन महिन्यापासून भाजप आमदार गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून कल्याण पूर्वेत शिवसेना,भाजपमध्ये तणाव आहे. खासदार शिंदे यांनी दिलेल्या पाठबळामुळे महेश हे आमदार गायकवाड यांना सतत त्रास देत होते,असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. तो रोष आता कल्याण लोकसभा निवडणुकीत काढण्याची तयारी कल्याण पूर्वेतील आमदार गायकवाड समर्थकांनी केली होती. त्याच्यावर आता पडदा पडला आहे.