रहिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात
ठाण्यातील घोडबंदर परिसरात नव्याने उभ्या राहिलेल्या इमारतींना उद्याने, मैदाने यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकाने महापालिकेकडे सेवा भूखंड हस्तांतरित केला आहे. मात्र, लोकपूरम भागात सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झालेल्या अशाच एका सेवा भूखंडावर महापालिकेने रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या या निर्णयास या भागातील रहिवाशांचा तीव्र विरोध असून हे मोकळे मैदान विस्थापितांसाठी खुले करून देण्याऐवजी येथे घोडबंदर भागातील रहिवाशांसाठी खुले मैदान अथवा उद्यान उभे केले जावे, अशी मागणी केली जात आहे.
यासंबंधीचे एक पत्रही आयुक्त संजीव जयस्वाल यांना देण्यात आले आहे. त्यानंतरही या मैदानावर दुकाने बांधण्यासाठी रेती, विटा येऊ लागल्याने हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी केला आहे. या भागातील विविध वसाहतींमधील रहिवासी महापालिकेच्या या निर्णयाविरोधात एकवटू लागले असून जयस्वाल यांच्या निर्णयाविरोधात प्रथमच नागरी नाराजीचे चित्र दिसू लागले आहे.
ठाण्यातील वसंत विहार परिसरातील ग्लॅडी अल्वारीस रोड परिसरात निहारिका सोसायटी हे गृहसंकुल असून तेथील चार इमारतींमध्ये सुमारे २९१ कुटुंबे राहतात. या भागातील रहिवाशांना चांगले उद्यान आणि मैदानासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी येथील विकासकाने महापालिकेस सुमारे १५१० चौरस फुटांचा भूखंड सेवा भूखंड म्हणून हस्तांतरित केला. २०१० पासून हे मैदान महापालिकेच्या ताब्यात असून या मोकळ्या मैदानाचा वापर महापालिकेने आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी केला आहे. या मोकळ्या जागांचा वापर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन, फटाक्यांचे बाजार तसेच कबुतरखाना म्हणून केला जातो. या सुविधा भूखंडावर लोकपुरम तसेच ग्लॅडी अल्वारिस मार्गावरील संकुलांमधील रहिवाशांसाठी एखादे उद्यान अथवा मोकळे मैदान उभारले जावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. असे असताना ५ जुन रोजी या भागात २५ ते ३० व्यक्ती पाहणी करण्यासाठी आल्या. त्यामुळे रहिवासी गोंधळले आहेत. पोखरण रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांना या भागात स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती या वेळी येथील रहिवाशांना मिळाली. या परिसरात दुकानांचे बांधकाम झाल्यास परिसरातील मोकळे मैदान नष्ट होणार असल्याची खंत रहिवाशांना वाटू लागली आहे.

सोसायटीच्या परिसरातील मोकळी जागा मैदान किंवा उद्यानासाठी वापरली जाईल, अशी अपेक्षा होती. महापालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष करून हे मैदान दुकानदारांना दिल्याने रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. या मोकळ्या जागेत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यापेक्षा या जागेत खेळाचे मैदान, उद्यान, नाना-नानी पार्क, ग्रंथालय यांसारख्या सुविधांसाठी वापर करण्याची गरज आहे.
– प्रविण आगरवाल, संचालक , निहारिका सोसायटी, ठाणे</strong>