‘आपण लग्न करू’ असा सातत्यानं शिक्षकाकडून होणाऱ्या मागणीला कंटाळून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीत असलेल्या या विद्यार्थिनीनं विषारी द्रव प्राशन करून जीवन संपवलं. ही घटना आळंदी येथे घडली. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हा भिवंडी पोलीस ठाण्यातून आळंदी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

संभाजी बारकू घोडविंदे (वय ३२, रा. घोडविंदे पाडा, ता. वाडा, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी विरार येथे राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी वाडा तालुक्यातील कुडुस येथील नॅशनल स्कुलमध्ये शिकत होती. आरोपी संभाजी हा आत्महत्या केलेल्या मुलीच्या वर्गावर शिकवणी घ्यायचा. तो मुलीला भेटून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करू, असे म्हणत सतत त्रास देत असे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

डिसेंबर २०१९ मध्ये मुलीच्या वडिलांनी मुलीला आळंदी येथील जोग महाराज व्यायाम शाळेत कुस्ती प्रशिक्षणासाठी पाठविले. तसेच सयाजीनाथ इंग्लिश माध्यम स्कूलमध्ये तिला नववीत दाखल करण्यात आलं. मात्र, आरोपी संभाजी याने मुलीचा पाठलाग सोडला नाही. सतत तिला कॉल करून त्रास देऊ लागला.

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून मुलीने आळंदी येथे ढेकूण मारण्याचे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीवर पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार केल्यानंतर मुलीला भिवंडी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान १ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षक संभाजी याच्याविरूद्ध मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.