घाऊकमध्ये दर कमी असतानाही विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

दिवाळसण तोंडावर आला असतानाही बाजारात उठाव नसल्याने घाऊक बाजारात डाळी, तेल, रवा, मैदा या वाणसामानाच्या दरांत मोठी घसरण झाली असली तरी, सर्वसामान्यांना मात्र ते चढय़ा दरानेच खरेदी करावे लागत आहे. वाशीतील घाऊक बाजारात उत्तम प्रतीची तूरडाळ ६५ रुपये किलो दराने मिळत असताना किरकोळ बाजारात मात्र ती ८५ ते ९० रुपयांना विकली जात आहे. रवा, मैदा, खोबरे तसेच इतर कृषीमालाचे दरही किरकोळ बाजारात चढेच आहेत.

गेल्या वर्षी दिवाळीच्या तोंडावर डाळींचे भाव गगनाला भिडले होते. उत्तम प्रतीची तूरडाळ या बाजारात किलोमागे १५० ते १७० रुपयांनी विकली जात होती. तसेच इतर डाळींचे दरही वाढले होते. यंदा मात्र उत्तम प्रतीची तूरडाळ घाऊक बाजारात ६६ रुपये किलो या दराने विकली जात आहे. गेल्या वर्षी तुटवडय़ामुळे २०० रुपयांपर्यंत पोहोचलेली तूरडाळ यंदा घाऊक बाजारात ५० ते ५५ रुपयांनी मिळत आहे, असे काही घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच दिवाळीच्या फराळात महत्त्वाची ठरणारी चणाडाळ ६५ ते ७० रुपयांना मिळत आहे. दिवाळीत साधारणपणे हरभरा डाळ, रवा, मदा, खोबरे, साखर आणि तेल या पदार्थाना मोठी मागणी असते. पण या सर्व पदार्थाच्या दरामध्ये सध्या घसरण सुरू आहे. हरभरा डाळीचे घाऊक दर किलोमागे ७० रुपये तर मूग-६४, उडीद-७२ यांसारख्या डाळींचे दरही स्थिरावले आहेत. खोबऱ्याचा गतवर्षीच्या तुलनेत (१७० रुपये) १२० ते १४० रुपयांपर्यंत खाली घसरला आहे. रवा-मदा तसेच पिठाच्या दरातही मोठी घसरण सुरू असून घाऊक बाजारात २० ते २२ रुपयांना हा माल उपलब्ध आहे. घाऊक बाजारात या दिवाळ सामानाच्या दारांमध्ये मोठी घसरण सुरू असताना किरकोळीत मात्र अजूनही हा माल चढय़ा दराने विकला जात असल्याचे चित्र आहे.

घाऊक बाजारात डाळी, दिवाळसामानाला पुरेशा प्रमाणावर खरेदीदार मिळत नसल्याची तक्रार व्यापारी करत असताना किरकोळ बाजारात तूर आणि चणाडाळीच्या किमती अजूनही चढय़ाच असल्याचे चित्र आहे. वाशी, ठाणे, मुंबईतील काही किराणा मालाच्या दुकानात उत्तम प्रतीची तूरडाळ ८५ ते ९० रुपयांना तर चणाडाळ ८० ते ८४ रुपयांना विकली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून आवक कमी झाल्याने महाग झालेली उडीदडाळ किरकोळ बाजारात नव्वदीच्या घरात पोहोचली आहे. मॉलमधील बडय़ा दुकानांमध्ये हे दर तुलनेने कमी असले तरी घाऊक बाजारांमधील एकंदर मंदीचा सूर पाहता किरकोळ ग्राहकांच्या पदरात तुलनेने महागच डाळी पडत असल्याचे चित्र आहे. घाऊक

बाजारात इतर दिवाळसामानाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी मैदा (३६ ते ३८ रुपये), गूळ (६० रुपये), खोबरं (२२० रुपये) चढय़ा दराने विकले जात आहेत. पुढील काही दिवसांत या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

घाऊक बाजारातील दरांच्या तुलनेत किरकोळीतील दर अधिक असले तरी किफायतशीर आहेत. दिवाळसण जवळ आल्याने ग्राहकांनी मालाची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चणाडाळ तसेच इतर दिवाळसामानाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मोहनलाल चौधरी, संजय सुपर मार्केट बोरीवली.

घाऊक बाजारात मालाला उठाव नसताना किरकोळ बाजारातील दर तुलनेने चढे असल्याचे चित्र आहे. ५० ते ५५ रुपयांना मिळणारी तूरडाळ काही किरकोळ विक्रेते ९० रुपयांना विकत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांवर प्रभाव पाडणाऱ्या किरकोळ विक्री व्यवस्थेवर कुणाचेही नियंत्रण नाही हेच यावरून दिसून येते.

मयूर सोनी, डाळींचे घाऊक व्यापारी.