करोनाकाळात रानभाज्यांना सुगीचे दिवस

जिल्ह्य़ात आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात ५ हजार ४०१ किलो भाज्यांची विक्री झाली

शहरी भागांतही मोठी मागणी

ठाणे : जिल्ह्य़ात आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्या महोत्सवात ५ हजार ४०१ किलो भाज्यांची विक्री झाली असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाची विक्री लक्षणीय असल्याची माहिती बाब समोर आली आहे. एरवी रानभाज्यांकडे ढुंकूनही बघत नसलेल्या अनेकांनी आता करोना काळात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रानभाज्यांचे सेवन करण्यास सुरुवात केली असून यामुळे यंदा रानभाज्यांच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढ झाल्याची माहिती रानभाजी विक्रेत्याने दिली. यामुळे करोनाकाळात रानभाज्यांना सुगीचे दिवस आल्याचे आणि या विक्रेत्यांनाही चांगले उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे.

पावसाळा सुरू होताच ग्रामीण भागातील शेतकरी पेंढर, तेरा, खुरासणी, शेवग्याचा पाला, कवळा, टाकळा, खडक अंबाडी अशा विविध प्रकारच्या रानभाज्या शहरातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. करोना टाळेबंदी आणि सततच्या निर्बधांमुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना शहरामध्ये रानभाज्यांची विक्री करणे शक्य झाले नव्हते. या भाज्यांच्या विक्रीतून त्यांना थोडेफार उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी हे उत्पन्न बुडाल्याने त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. करोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे बाजारपेठा पूर्वीसारख्या खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे या बाजारपेठांमध्ये रानभाज्यांची विक्री करणे शेतकऱ्यांना शक्य होत आहे. त्याचबरोबर राज्य आणि जिल्हा स्तरावरही रानभाज्या विक्री महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे आयुर्वेदिक वैशिष्टय़ आणि त्याची पाककृती याविषयी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे अनेकजण रानभाज्यांच्या सेवनाकडे वळू लागल्याचे चित्र आहे. करोना काळात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नागरिकांकडून आहाराचे सेवन केले जात आहे. आता रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाज्यांचे सेवन करीत आहेत. मधुमेह, पोटदुखी तसेच इतर काही आजारांवरही रानभाज्या फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे रानभाज्याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे, असे एका विक्रेत्याने सांगितले. आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक रोजगार उपलब्ध व्हावा, शहरी भागातील नागरिकांनाही रानभाज्यांचे महत्त्व कळावे आणि त्यांना सहजरित्या या भाज्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी रानभाज्या महोत्सव केला जातो. यंदा करोनामुळे या भाज्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे, असे ठाणे जिल्हा कृषी विभागाचे अधीक्षक अंकुश माने यांनी सांगितले.

गृहसंकुलात विक्रीचे नियोजन

ठाणे जिल्ह्य़ात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रानभाज्या महोत्सवात एकूण ५ हजार ४०१ किलो भाज्यांची विक्री झाली आहे. शहरी भागातही रानभाज्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळे येत्या काही दिवसात गृहसंकुलात या भाज्यांची विक्री करण्याचे नियोजन आहे. आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या या भाज्या शिजविण्याची तसेच त्या खाण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. ही पद्धत अद्याप ज्ञात नसल्यामुळे शहरी भागातील नागरिक या भाज्या खरेदी करीत नव्हते. परंतु महोत्सवामध्ये पाककृतीबाबत मार्गदर्शन केल्याने आता प्रतिसाद मिळत आहे.

यंदा महोत्सवात झालेली रानभाज्यांची विक्री

दिवस   विक्री (किलो)

९ ऑगस्ट   १३६७

१० ऑगस्ट  ६६५

११ ऑगस्ट  ५७१

१२ ऑगस्ट  ६३७

१३ ऑगस्ट  ७७३

१४ ऑगस्ट  ६०७

१५ ऑगस्ट  ७८१

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Harvest days legumes during corona period ssh