लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उत्तरप्रदेशातील त्यांच्या मूळ गावांमधून कौशल्याने अटक केली आहे. त्यांच्याकडून २३ लाखाचा सोने, चांदीचा चोरीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींवर एकूण यापूर्वी २० गुन्हे दाखल आहेत.

घाटकोपर, ठाण्यातील कासारवडवली पोलीस या दोन्ही चोरट्यांचा मागावर होते. त्यांनी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या केल्या आहेत. चिंटू निशाद चौधरी (३५, रा. दिवा-साबे, स्मशानभूमी, मूळ गाव-किशुन्धर ज्योत, मेहू, उत्तरप्रदेश), बब्लू उर्फ राजेश बनारसी कहार (४०, रा. मेहू, उत्तरप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात या चोरट्यांनी यापूर्वी चोऱ्या केल्या होत्या. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. एका सीसीटीव्ही चित्रीकरणात मानपाडा पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली होती. दोन्ही आरोपी हे चोऱ्या करून त्यांच्या मूळ उत्तर प्रदेशातील मूळ गावी पळून गेले असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांना मिळाली होती.

आणखी वाचा-मागील दहा वर्षात थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांकडे खरेदीदारांची पाठ

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे एक पथक आरोपी राहत असलेल्या गावी गेले होते. तेथे त्यांनी काही दिवस पाळत ठेऊन आरोपी त्यांच्या गावात राहतात का याची खात्री केली. आरोपी गावातील घरीच असल्याचे समजल्यावर पोलिसांनी पहाटेच्या वेळेत दोघांच्या घरावर एकाचवेळी रात्रीच्या वेळेत छापा टाकला. दोन्ही आरोपींना अटक केली.त्यांच्याकडून ३२५ ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

कहार याच्यावर १३, चौधरीवर सात गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी यापूर्वी मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तालय भागात चोऱ्या केल्या होत्या. त्यांना यापूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींनी फरार असताना किती गुन्हे केले आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत. डोंबिवली शहर परिसरातील अनेक गुन्हे याचोरट्यांमुळे उघड होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी व्यक्त केली.