रोम जळत असताना निरो राजा फिडल वाजवत होता. दुर्दैव असे की डोंबिवली एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक ग्रामीण पट्टय़ात त्याची पुनरावृत्ती पोलीस करीत आहेत. या भागांत घरफोडय़ा आणि लूटमारीच्या घटनांना ऊत आला असताना पोलीस निव्वळ खुर्चीत बसून असल्याची प्रचीती येथील नागरिकांना येत आहे. चोरटय़ांना नेस्तनाबूत करण्यासाठी पोलिसांनी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून एमआयडीसीतील घरडा सर्कल येथे नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले.
 मानपाडा पोलीस ठाण्यात एखादी तक्रार करण्यास गेले असता फारसा प्रतिसाद मिळत नाही. गुन्हा दाखल करण्यापेक्षा फिर्यादीला तक्रार मागे घे, अदखल पात्र गुन्हा दाखल कर असे सांगून आरोपींची पाठराखण करण्यात मानपाडा पोलीस पुढाकार घेत आहेत, असा आरोप भाजपने केला.
एमआयडीसी परिसरात दिवसा घरफोडय़ा, लुटीच्या घटना घडत आहेत. या चोरटय़ांचा बंदोबस्त होताना दिसत नाही. अशा पोलीस अधिकाऱ्यांकडून लोकांचे कोणतेही संरक्षण होणे शक्य नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. भंगार माफिया, बीयर बार यांची पाठराखण करण्यात या पोलिसांचा वेळ चालला आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. कल्याणचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन एमआयडीसी परिसरातील चोरटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी योजना आखण्यात येईल. या भागात कायमस्वरूपी गस्त ठेवण्यात येईल अशी आश्वासने दिली. या उपोषणात ग्रामीण भाजपचे अध्यक्ष नंदू परब, हरीहर कांत, गणेश म्हात्रे, नंदू जोशी, भालचंद्र लोहकरे आदी ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.