scorecardresearch

ठाण्यात बेकायदा बांधकामे सुरूच ; पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा, दिवा, माजिवडा यासारख्या भागात पुन्हा एकदा भूमाफियांची चलती सुरू झाली असून तीन, चार मजल्यांच्या इमारतींची बिनधोकपणे बांधकामे सुरू झाली आहेत. बेकायदा बांधकामांचे आगार ठरलेल्या दिव्यात तर एका रांगेत बेकायदा इमारतींची बांधकामे सुरू असून त्याकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यात इमारती, चाळी, लॉज आणि दुकानांचा समावेश आहे. कळवा, मुंब्रा, घोडबंदर, नौपाडा, कोपरी आणि वर्तकनगर भागात ही बांधकामे झाली आहेत. या बांधकामांना पालिकेने प्रभाग समितीच्या माध्यमातून नोटिसा बजावल्या होत्या. गेल्या तीन वर्षांत किती बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याची माहिती पालिकेच्या पथकाने घेतली असता, त्यात एक हजाराच्या आसपास बेकायदा बांधकामे उभी राहिल्याचे उघड झाले होते. या बांधकामांच्या मुद्दय़ावरून टीका होऊ लागताच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली होती.

बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी आयुक्त शर्मा यांच्यावर राजकीय दबाव येऊ लागला होता. त्यासाठी भूमिपुत्रांचे कार्डही पुढे रेटण्यात आले. सुरुवातीला डॉ. शर्मा यांनी हा दबाव झुगारत कारवाई सुरूच ठेवली. अतिक्रमण विभागाचा कार्यभार नव्या उपायुक्तांकडे सोपविण्यात आला. सुरुवातीला बेकायदा बांधकामांवर जोमाने कारवाई झाली. काही महिन्यांनंतर मात्र ही कारवाई थंडावली. कारवाई थंडावताच पुन्हा एकदा भूमाफियांनी उचल खाल्ली आहे. मुंब्रा तसेच दिवा भागात बेकायदा इमारतीची बांधकामे वेगाने सुरू झाली आहेत. मुंब्रा येथील खान कंपाऊंड परिसरात आठ ते दहा मजली बेकायदा इमारती उभारण्यात येत असून या इमारतींचे स्लॅब पाच ते सात दिवसांत टाकले जात आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीच ही बाब उघडकीस आणली होती. यामुळे शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटल्याचे चित्र पुढे आले आहे.

अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यास विलंब

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जबाबदारी मध्यंतरी अश्विनी वाघमळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. वाघमळे यांची मध्यंतरी राज्य सरकारने बदली केली. त्यानंतरही बराच काळ त्या महापालिकेत कार्यरत होत्या. या काळात मुंब्रा, दिवा भागांत बेकायदा बांधकामांचे पेव फुटल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. बदली होऊनही वाघमळे यांना कार्यमुक्त करण्यात इतका मोठा कालावधी का लागला याविषयी वेगवेगळय़ा चर्चाना आता तोंड फुटले आहे. दरम्यान, गुरुवारी वाघमळे यांना कार्यमुक्त करत अतिक्रमण विभागाचा कार्यभार अशोक बुरपुल्ले यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वेळीच कारवाई का नाही?

एखाद्या इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी काही महिने लागतात. त्यामुळे शहरात अशा इमारतींची बांधकामे सुरू होतात, त्यावेळेस ही बांधकामे प्रशासनाच्या निदर्शनास येत नाहीत का आणि वेळीच ही बांधकामे जमीनदोस्त का केली जात नाहीत. तसेच एका दिवसाच्या कारवाईत संपूर्ण इमारत कशी जमीनदोस्त होईल, असा प्रश्न उपस्थित करत काही लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाच्या कारभारावर यापूर्वी सर्वसाधारण सभेत संशय व्यक्त केला होता.

अधिकाऱ्यांना नोटिसा

ज्या सहायक आयुक्तांच्या काळात ही बांधकामे उभी राहिली, त्याची माहिती घेऊन कारवाई करण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींनी धरला होता. त्यानुसार पालिका प्रशासनाने सहायक आयुक्तांकडून माहिती मागवून त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. काही सहायक आयुक्तांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे, तर काहींनी अद्याप दिलेले नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे ही कारवाई केवळ नोटीस बजावण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal constructions continue in thane zws

ताज्या बातम्या