जिज्ञासा ट्रस्ट ठाणे, २ जयानंद सोसायटी, महात्मा गांधी मार्ग, नौपाडा ठाणे.
त्यांची गंभीर चर्चा सुरूहोती. यावेळचा अंक हा विज्ञानासाठी काढण्याचा निर्णय झाला असला तरी अंकाचे स्वरूप, त्यातील लेखक, विषयांची मांडणी आणि सजावट यावर त्यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगला होता. अंकात भारतीय विज्ञानाची प्रगती, शासनाक डून मिळणारा निधी, जागतिक संशोधन, अवकाश संशोधनाचे महत्त्व तसेच विज्ञानकथेसह अंकाचा बाज नक्की झाला. ज्या पद्धतीने त्यांच्यात अंकाविषयी चर्चा होती, ते थक्क करणारे होते. कारण ही सारी आठवी ते दहावीची मुले होती. ‘जिज्ञासा’ विज्ञानविषयक अंकाच्या संपादनाचे काम हे बाल संपादक मंडळ करत होते.
ठाण्याच्या नौपाडा येथील ‘त्या’ घरात, खरे तर संपादक मंडळाचे ह्क्काचे कार्यालय असलेल्या त्या जागेत मुलांचे भविष्य घडविण्याचे काम अखंड सुरूअसते. १९९३ मध्ये मुलांनी संपादित केलेला जिज्ञासाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. तेव्हापासून आजपर्यंत अंखंडपणे हा ‘जिज्ञासा’चा ज्ञानयज्ञ सुरूआहे. साहित्य, संस्कृती, विज्ञानासह अनेक विषयांवर मुलांनी मुलांसाठी अंक काढले आहेत. पहिल्या अंकाचे संपादन करणारी मुले आज तिशी-पस्तिशीची झाली असून वेगवेगळ्या क्षेत्रात आज ती नावलौकिक मिळवून आहेत. यातील काही मुले वैज्ञानिक बनली तर काही चांगली साहित्यिक तर काही कलावंत म्हणून नावारूपाला आली आहेत.
शाळा आणि पालक जे संस्कार देऊ शकत नाहीत असे संस्कार देण्याची दृष्टी बाळगून सुरेंद्र दिघे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुमीता यांनी मुलांमधील जिज्ञासा प्रकट व्हावी तसेच त्यांना आव्हानांचा सामना करता यावा, यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू केले. सुरुवातीला मुलांना घेऊन ट्रेकिंगचा उपक्रम सुरू केला. गडकिल्ले तसेच उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. याच काळात ग्रंथालीच्या दिनकर गांगलांची भेट झाली आणि मुलांसाठी ‘जिज्ञासा’ हे मासिक सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गेले दोन तप हे मासिक यशस्वीपणे मुले चालवत आहेत. वर्षभर आमच्याकडेही अनेक उपक्रम व कार्यक्रम सुरूअसतात. मुले हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असल्यामुळे आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वेळेत आले नाहीत, तरीही एक मिनिटही उशीर होऊ दिला जात नाही, सुरेंद्र दिघे सांगत होते. सामान्यपणे होते असे की मंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावले की मुले व शिक्षक हे वेठबिगार बनतात. आमच्याकडे असले काही चालत नाही. विज्ञान, आदिवासी विज्ञान, छोटा न्यूटन, गणितविषयक अनेक उपक्रम, बालशिक्षण संस्कार केंद्र, ज्ञान सेतू, पर्यावरण व निसर्ग संवर्धन असे अनेक उपक्रम गेल्या तीन दशकांच्या काळात आम्ही राबवत आहोत. मुलांमधील जिज्ञासा, ज्ञानलालसा वाढविताना त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आमच्या संस्थेत केले जाते. त्यामुळेच कुसुमाग्रजांपासून जयंत नारळीकरांपर्यंत अनेक मान्यवरांनी आमच्या कार्याची दखल घेऊन मनापासून कौतुक केले. आमच्या मुलांनी सचिन तेंडुलकरपासून अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांच्या मुलांना घेऊन आम्ही ट्रेकिंगलाही गेलो आहोत. दिघे भरभरून बोलत होते. त्यांचे पिकलेले केस व दाढी पाहून त्यांनी साठी पार केली हे लक्षात येत असले तरी त्यांचा उत्साह हा पंचविशीतल्या तरुणाचा आहे. गेली अनेक वर्षे दिवाळीत गडकिल्ले, पावसाळ्यात लोहगडापासून ते कळसुबाईच्या शिखरावर मुलांना घेऊन जायचे. उन्हाळ्यात मनाली येथे शास्त्रोक्त गिर्यारोहणाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करायचे हे सोपे काम नाही. गेली तीन दशके सुरेंद्र दिघे व त्यांची मित्रमंडळी हे काम अव्याहतपणे करत आहेत. त्यात सागर ओक, हेमंत देशमुख, गावंडसर, शांताराम राऊत, मानसी विनोद, रिमा देसाई अशा अनेकांचा सहभाग आहे. मुलांमध्ये मूलभूत विज्ञान व संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेने विशेष मेहनत घेण्यास सुरुवात केली. त्यालाही आता दोन दशकांचा काळ उलटून गेला. या काळात राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, आदिवासी बाल विज्ञान परिषद, विज्ञान संशोधिका आणि विज्ञान केंद्र असे अनेक उपक्रम राबविले. राज्यातील सर्व जिल्ह्य़ामधील हजारो शाळांनी विज्ञानाच्या या प्रवासात त्यांना साथ दिली असून हजारो विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण केले. आदिवासी भागातील मुलांमध्ये विज्ञान व गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी ‘गणित यात्रे’पासून अनेक उपक्रम राबविले. सुरेंद्र दिघे यांचे घर म्हणाल तर स्वत:च्या घरात ते पेईंग गेस्टसारखे राहातात. त्यांचे घर हे मुलांसाठी आहे. मुले तेथे मस्ती करतात. विज्ञानाच्या प्रयोगापासून ते साहित्यावर चर्चा करतात. आगामी काळात घरकाम करणाऱ्या महिला तसेच कचरा वेचणाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी उपक्रम राबविण्याची सुरेंद्र दिघे यांची योजना आहे.