ठाणे : घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या खारेगाव ते गायमुख या खाडीकिनारी मार्ग उभारण्याची प्रक्रीया वेगाने सुरू आहे. त्यापाठोपाठ हा खाडीकिनारी मार्ग आता खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडून तिथे जंक्शन तयार करण्यात येणार असून यासंबंधीचा सविस्तर आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केला आहे. रस्ता आणि जंक्शन तयार करण्यासाठी पालिकेने येथील जमिनीचे आरक्षण बदल्याची प्रक्रीया सुरू केली आहे. यामुळे भिवंडी भागातील वाहतूकीसाठीही या मार्गाचा फायदा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या परिसरात गेल्या काही वर्षात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. येथील नागरिकांचीही घोडबंदर मार्गेच वाहतूक सुरू असते. यामुळे या मार्गावर कोंडी वाढली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी घोडबंदरला पर्यायी असा ठाणे खाडीकिनारी मार्ग उभारण्यात येणार आहे. खारेगाव ते गायमुख असा १३ किमी लांबीचा खाडीकिनारी मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गामध्ये काही ठिकाणी उन्नत तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. या कामासाठी महापालिका प्रशासनाने १३१६ कोटी १८ लाख रुपयांचा आराखडा तयार करून तो एमएमआरडीएकडे सादर केला होता. या प्रकल्पाच्या बांधकामाच्या प्रस्तावास एमएमआरडीएने मंजुरी दिली होती. परंतु या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन तो २६७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हेही वाचा >>> सिलिंडर गळतीमुळे आगीचा भडका उडून दोन जण जखमी

या सुधारित खर्चाच्या प्रस्तावाला एमएमआरडीएने नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसेच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याची प्रक्रीया पालिका पातळीवर सुरू आहे. असे असतानाच, आता हा मार्ग खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडण्यात येणार असून त्यासाठी रस्ते बांधणीबरोबरच जंक्शन उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील या कामाचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार रस्ते आणि जंक्शनसाठी पालिकेला जागेचे आरक्षण बदलावे लागणार आहे. या संबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून त्यास नुकत्याच झालेल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. यानुसार पालिकेने आता आरक्षण फेरबदलासाठी ३० दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सुचना मागविल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सुचनांवर सुनावणी घेऊन निकाली काढल्या जाणार आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.

जागा बदलाचा प्रस्ताव

खारेगाव येथील रस्ते आणि जंक्शन कामात एकूण २२१३२.२२ चौ.मी क्षेत्र बाधीत होणार आहे. याठिकाणी अस्तित्वातील सॅण्ड क्लेकशन, हरीत विभाग, जलाशय असे जागेचे आरक्षण आहे. तसेच बाळकुम येथील येथील रस्ते आणि जंक्शन कामात ११९६० चौ.मी क्षेत्र बाधीत होणार आहे. याठिकाणी बगीचा, रहिवास विभाग, नाला, एमसीजीएम वाहिनी आणि एचसीएमटीआर कारशेड असे जागेचे आरक्षण आहे. या दोन्ही ठिकाणे आरक्षण बदलून त्याठिकाणी पुल आणि रस्ते असे आरक्षण टाकण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junction at two places on the thane bay coastal route ghodbander road ysh