कल्याण आणि डोंबिवली ही दोन्ही शहरे तशी सांस्कृतिकतेचा टेंभा मिरवणारी. नियोजन, विकासाचे या शहरांना तसे वावडे. अरुंद रस्ते, पदपथ.. तेही फेरीवाल्यांनी बळकावलेले. फेरीवाल्यांच्या फेऱ्यातून रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉक तरी कसा सुटेल? दोन्ही रेल्वे स्थानकांबाहेर उभारण्यात आलेल्या स्कायवॉकवर आता अक्षरश: फेरीवाला क्षेत्र तयार झाले आहे.
कोटय़वधी रुपयांचा खर्च करत फारशी वर्दळ नसलेल्या भागातही स्कॉयवॉक उभारून आपण खरोखर प्रवाशांचे हित साधतो आहोत काय, याचा विचार उशिरा का होईना प्रशासकीय स्तरावर सुरू झाला आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी सध्या उभारण्यात आलेल्या स्कॉयवॉकची अवस्था काय झाली आहे, याचा र्सवकक्ष असा आढावा घेण्याची आता वेळ आली आहे. रेल्वे स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना स्थानक परिसरातील गर्दी टाळता यावी आणि थेट रिक्षा किंवा बस गाठता यावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने कल्याण डोंबिवली स्थानक परिसरात उभारलेले स्कॉयवॉक म्हणजे प्रशासकीय आणि राजकीय अव्यवस्थेचा नमुना ठरू लागला आहे.
ही दोन्ही शहरे तशी सांस्कृतिकतेचा टेंभा मिरवणारी. नियोजन, विकासाचे या शहरांना तसे वावडे. अरुंद रस्ते, पदपथ.. तेही फेरीवाल्यांनी बळकावलेले. वाहने उभी करण्यासाठी अपुरी व्यवस्था अशी नियोजनाची शकले या शहरात जागोजाही दिसून येतात. फेरीवाल्यांच्या फेऱ्यातून रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉक तरी कसा सुटेल? कल्याण आणि डोंबिवली दोन्ही रेल्वे स्थानकांबाहेर उभारण्यात आलेल्या स्कायवॉकवर आता अक्षरश: फेरीवाला क्षेत्र तयार झाले आहे. तेही बेकायदा! नियोजनाअभावी आधीच घायकुतीला आलेल्या या शहरांचे ढासळलेल्या व्यवस्थेचे म्हणूनच हे स्कायवॉक प्रतीक बनले आहेत.
‘एमएमआरडीए’च्या सहकार्याने स्थानिक महापालिकांनी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे कोटय़वधी रुपये खर्च करून स्कायवॉक बांधले आहेत. यापूर्वी रेल्वे स्थानकांतून बाहेर पडताना प्रवाशांची एकाच प्रवेशद्वारातून बाहेर पडताना किंवा रेल्वे स्थानकात येताना जी दररोज घुसमट व्हायची ती काही प्रमाणात या स्कायवॉकमुळे बंद झाली. या स्कायवॉकची बांधणी व्हावी यासाठी सुरुवातीला अतिशय आग्रही असणारे लोकप्रतिनिधी येथील दुरवस्थेविषयी मात्र मूग गिळून बसले आहेत. रेल्वे स्थानकातील पुलाला जोडून महापालिका हद्दीतील रस्त्याला जोडलेला स्कायवॉकचा भाग हा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात की ठाणे पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत, असे फुटकळ वाद वर्षांनुवर्षे सुरू आहेत. मुळात स्वतची अकार्यक्षमता लपविण्यासाठी असे वाद उभे केले जातात. त्यामुळे गर्दुल्ले, नशाबाज, मद्यपी, गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती, फेरीवाले, भिकारी यांच्यासाठी हे स्कायवॉक आश्रय ठरू लागले आहेत. हे नशाबाज एकटय़ा जाणाऱ्या महिला, तरुणींची छेड काढतात, पुरुष प्रवाशांना दमदाटी करतात. लूट, मारहाणीच्या घटनाही येथे घडल्या आहेत. हद्दीच्या वादातून या स्कायवॉकवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, पालिकेकडून कारवाई केली जात नाही. स्कायवॉक पालिकेने बांधला आहे. त्यामुळे महापालिकेनेच पुढे काय ते बघावे, असे पोलिसांचे म्हणणे असते. हप्तेबाजीमुळे महापालिकेचे कर्मचारी/ अधिकारीदेखील त्याकडे ढुंकून पाहत नाही. या दुहेरी वादातून फेरीवाल्यांची चंगळ सुरू आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉक मागील तीन वर्षे फेरीवाल्यांनी काबीज केला होता. या स्कायवॉकवरून प्रवाशांना चालणे अवघड होते. कल्याणच्या आमदारांनी चार ते पाच वेळा बैठका घेऊन हे फेरीवाले हटवण्याची तंबी दिली. प्रसंगी न्यायालयात जाऊ असा इशारा दिल्यानंतर कल्याणच्या स्कायवॉकवरील फेरीवाल्यांची गर्दी कमी झाली आहे. तरी डोंबिवलीतील फेरीवाले ठाण मांडून आहेत. अशीच परिस्थिती उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली भागातील आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने स्कायवॉक उभारला आहे. या स्कायवॉकवर जाहिराती लावण्यासह सगळे हक्क महानगर विकास प्राधिकरणाने महापालिका प्रशासनाला द्यावेत, असे पालिका प्रशासनाचे मत आहे. या वादात अनेक वर्षे गेली. एमएमआरडीए हक्क सोडत नाही म्हणून मग त्याकडे आपण का लक्ष द्यायचे, असा प्रश्न नगरसेवकांकडून नेहमी करण्यात येतो. या वादात स्कायवॉकच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत गेले. आणि त्या स्कायवॉकचे फर्निचरचे टप्पे कोसळणे, स्लॅब कोसळणे असे प्रकार सुरू झाले आहेत.
कोटय़वधी रुपये रकमेचा अर्थसंकल्प असलेल्या कल्याण डोंबिवली पालिका, उल्हासनगर पालिका, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका या स्कायवॉकच्या सुरक्षितेतसाठी सुरक्षारक्षक तैनात का करू शकत नाहीत, हा खरा सवाल आहे. शहरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक रहिवाशांचा ज्या ठिकाणी नियमित वावर असतो तेथील व्यवस्था आपण पाहावी, असे स्थानिक प्राधिकरणांना का वाटू नये? स्थानिक रहिवाशांच्या प्रश्नांशी नाळ तुटली की प्रशासकीय अव्यवस्था कशी निर्माण होते याचे उत्तम उदाहरण म्हणून या स्कायवॉककडे पाहता येईल. या स्कायवॉकची देखभाल जशी स्थानिक पालिका प्रशासन करीत आहेत, तशी या स्कायवॉकवर कायमस्वरूपी दोन ते चार सुरक्षारक्षक पाळीने तैनात केले तर रेल्वे पोलीस, सामान्य पोलिसांना या स्कायवॉकवरील गुन्हेगारीला आवर घालणे शक्य होईल. गटारे, पायवाटांमध्ये रममाण नगरसेवकांनी स्कायवॉकवर कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाऊल उचलावे. स्कायवॉकवरील या भटक्यांचे निवारे बंद झाले की हळूहळू परिसरातील हाणामाऱ्या, चोऱ्यांचे प्रमाणही कमी होईल.
कल्याण-डोंबिवलीकर येत्या काही महिन्यांत आणखी एका निवडणुकीला सामोरे जात असताना येत्या काही दिवसांत राजकीय रणधुमाळीला येथे सुरुवात होईल. विकासकामांची मोठाली आश्वासने दिली जातील. बडय़ा नेत्यांच्या जाहीर सभांमध्ये शक्तिप्रदर्शन होताना दिसेल. या रणधुमाळीत कल्याण-डोंबिवलीतील सामान्य मतदार स्वतचे मनोरंजनही करून घेतील. रेल्वे स्थानकाला लागून सर्वसामान्यांना शहराशी जोडणाऱ्या स्कायवॉकची दुरवस्था येथील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाहीत, हे मात्र खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan skywalk taken over by illegal hawkers
First published on: 15-07-2015 at 12:18 IST