आर्थिक तूट भरून काढण्यासाठी अर्थसंकल्पात आयुक्तांचे प्रयत्न
रस्ते, उड्डाणपुलांच्या उभारणीसाठी भरीव तरतूद
बेकायदा बांधकामे, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, वाहतूक कोंडी यांसह आर्थिक चणचण अशा समस्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कारभार रुळावर आणण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी असलेला अर्थसंकल्प महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सोमवारी पालिकेच्या स्थायी समितीसमोर सादर केला. पालिकेची आर्थिक तूट कमी करण्यासाठी भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली आकारण्याचे संकेत, नाटय़गृहांचे खासगीकरण, पालिकेच्या मालमत्ता भाडय़ाने देणे अशा उपाययोजना वापरण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले आहे. त्याच वेळी सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकरांचा प्रवास वेगवान आणि सुलभ व्हावा, यासाठी शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांची बांधणी, समांतर रस्त्यांची उभारणी अशा प्रकल्पांची घोषणाही आयुक्तांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज कामाने सर्वाचे लक्ष वेधून घेणारे रवींद्रन आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात काय मांडतात याविषयी महापालिका वर्तुळात कमालीची उत्सुकता होती. अर्थसंकल्प विलंबाने सादर करण्याची आधीच्या आयुक्तांची प्रथा मोडीत काढत रवींद्रन यांनी सोमवारी १६६३ कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडला. त्यासोबतच सन २०१५-१६ चा ११३५ कोटींचा जमा व १०८९ कोटी खर्चाचा सुधारित अर्थसंकल्प या वेळी प्रशासनाने सादर केला.
पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी नाटय़गृहांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या मालमत्ता भाडय़ाने देण्यात येणार आहेत. व्यावसायिक गाळे अधिमूल्य आकारून दीर्घ मुदतीसाठी भाडय़ाने देण्यात येणार आहेत. तसेच ‘पैसे मोजा आणि वाहने उभी करा’ या धर्तीवर वाहनतळ धोरण राबवण्यात येणार आहे. याशिवाय मालमत्ता, पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नसली तरी येत्या काळात मालमत्तांच्या भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू केली जाईल असे संकेत या अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. त्यामुळे ५०० चौरस फुटांपेक्षा अधिक आकाराच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या करात अंशत: वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाण्याच्या नियोजनासाठी टेलीस्कोपिक पद्धतीचा वापर करून पाणी दरवाढ करण्यात येईल, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
आर्थिक पातळीवर पालिकेचा कारभार सक्षम करण्याचा प्रयत्न करतानाच आयुक्तांनी कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास वेगवान करण्याची हमीदेखील दिली आहे. त्यानुसार, डोंबिवली-ठाणे समांतर रस्ता, कल्याण-डोंबिवली समांतर रस्ता, डोंबिवली-टिटवाळा बाह्यवळण रस्ता, मलंग रस्ता ते नेवाळी रस्ता रुंदीकरण, वडवली-टिटवाळा समांतर रस्ता तयार करणे, ठाकुर्ली, मोहने, वालधुनी उड्डाणपुलाची उभारणी अशा प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पालिकेत नव्याने समावेश झालेल्या २७ गावांच्या सर्वागीण विकास करण्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या विकासनिधीतून गावांमध्ये प्राथमिक शिक्षण, आरोग्य, घनकचरा, मल, रस्ते, उद्याने व पाणीपुरवठा प्रकल्पांवर खर्च करण्यात येणार आहे.