ठाणे आणि ठाकुर्ली येथील इमारती कोसळल्याच्या घटनांमुळे सतर्क झालेल्या ठाणे जिल्हा प्रशासनाने शहरांतील धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करण्यासाठीचा कृती आराखडा बनवण्याचे आदेश स्थानिक महापालिकांना दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील ५० अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. महापालिकेने तयार केलेल्या आराखडय़ानुसार दोन्ही शहरांतील २९१ धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरांतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. उपायुक्त सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण विभागासाठी कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते, नगररचनाकार सुभाष पाटील, कनिष्ठ अभियंता अवधूत मदन, डोंबिवलीसाठी कार्यकारी अभियंता रविकांत जौरस, नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे, भगतसिंग राजपूत अशा अधिकाऱ्यांचे पथक यासाठी नेमण्यात आले आहे. या पथकाच्या सोबतीला २० कामगार व १० पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानंतर दोन ते तीन टप्प्यात २९१ अतिधोकादायक इमारती महापालिकेच्या पथकाकडून जमीनदोस्त केल्या जातील, असे महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला सांगितले. या कारवाईत मालक अथवा भाडेकरूंनी अडथळा आणू नये असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. मात्र, या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन कोण व कसे करणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. शहरांतील ३५० धोकादायक इमारतींमध्ये सुमारे दीड लाख रहिवासी राहत आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पालिकेची नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे या इमारतींबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेते, याकडे लक्ष लागलेले आहे.