कराचा भरणा करण्याची पालिकेची सूचना

ठाणे : करोनाकाळात जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिका प्रशासनाने आता मोठय़ा थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. साडेआठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या ठाण्यातील नामांकित कोरम मॉलवर कारवाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. मंगळवारी पालिकेच्या पथकाने कोरम मॉलमध्ये जाऊन व्यवस्थापनाची भेट घेतली. कराचा भरणा लवकर केला नाहीतर मॉलला टाळे ठोकण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पथकाने यावेळी दिला.

गेल्या दीड वर्षांत करोना संकटामुळे महापालिकेच्या विविध विभागांच्या करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. करोनाकाळातही ठाणेकरांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मालमत्ता कर आणि पाणी देयकांचा भरणा केला आहे. या दोन्ही करांच्या वसुलीमुळेच पालिकेचा आर्थिक गाडा कसाबसा सुरू आहे. त्यामुळेच महापालिकेने शहरातील मोठय़ा थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

या थकबाकीदारांच्या यादीमध्ये ठाण्यातील नामांकित कोरम मॉलचा समावेश असून या मॉलने साडेआठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. ही थकीत रक्कम गेल्या वर्षीची आणि चालू वर्षांची आहे. या थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेचे पथक मंगळवारी कोरम मॉलमध्ये गेले होते. पथकाने मॉल व्यवस्थापनाची भेट घेऊन त्यांना कराचा भरणा करण्यास सांगितले. एकाच वेळी इतकी रक्कम भरणे शक्य नसल्याचे मॉल व्यवस्थापनाचे म्हणणे होते, असे पालिका सूत्रांनी सांगितले. त्यावर एकाच वेळी इतकी रक्कम भरणे शक्य नसेल तर टप्प्याटप्प्याने रक्कम भरा आणि ही रक्कम केव्हापर्यंत भरली जाणार याचे लेखी पत्र द्या, अशी सूचना पालिकेने केली. तसेच कराचा भारणा लवकर केला नाहीतर मॉलला टाळे ठोकण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पथकाने यावेळी दिला.

ज्यांनी कराचा भरणा केली नाहीतर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोरम मॉलने साडेआठ कोटींचा मालमत्ता कर थकविला असून त्यांनी कराचा भरणा केला नाहीतर त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

– संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठामपा