ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या फिरताना दिसला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने बुधवारी सकाळी खळबळ उडाली. कोरम मॉलवरुन हा बिबट्या सत्कार हॉटेलमधील पार्किंग परिसरात पोहोचला. वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला जेरबंद केले. या ठिकाणापासून जंगल लांब असल्याने  निवासी भागापर्यंत हा बिबट्या पोहोचलाच कसा, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

ठाणे पश्चिमेला समतानगर येथे कोरम मॉल असून या मॉलजवळ निवासी विभाग आणि रुग्णालय देखील आहे. मंगळवारी रात्री मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. मॉलमधील पार्किंगजवळ बिबट्याचा वावर होता. हा प्रकार समजताच मॉलमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंतीवरून सकाळी साडे सहाच्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले.

यानंतर वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध सुरु केला. काही वेळातच बिबट्या पोखरण रोडवरील सत्कार हॉटेल रेसिडन्सी येथील पार्किंग परिसरात दिसल्याची माहिती मिळाली. यानंतर येऊरमधील वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार आणि त्यांची टीम सत्कार हॉटेलच्या दिशेने रवाना झाली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्याला आधी बेशुद्ध करण्यात आले आणि  त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले.