सात हजार १९ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ; अध्ययनातील सहभाग वाढवणार

महापालिकेच्या शाळेतील पहिले ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहामाही इंग्रजी संभाषण प्रशिक्षण देण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे पालिकेच्या शाळेतील सात हजार १९ विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

गुणवत्ता असूनही केवळ इंग्रजी भाषेमुळे विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीत अडथळा निर्माण होऊ शकतो. परीक्षेत उत्तीर्ण होण्यापुरते इंग्रजीचे पाठांतर करणे, ही आजवरच्या इंग्रजी विषयाच्या अध्ययनाची पद्धत आता हद्दपार होऊ लागली आहे. इंग्रजीची भीती जाऊन या भाषेची गोडी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या अध्यापनात अधिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न विविध स्तरांवर केला जात आहे. वाचन, लेखन, भाषण आणि संभाषणात विद्यार्थी पारंगत होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणारा पाठय़क्रम तयार करण्यात आला आहे. मात्र हे सर्व नावीन्यपूर्ण उपक्रम खासगी शाळांपुरते मर्यादित असल्याने पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आजही इंग्रजीविषयी न्यूनगंड बाळगून असतात. यासाठी महापालिकेच्या वतीने मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तामीळ माध्यमाच्या एकूण ५९ शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात येईल.

‘खालावता दर्जा सुधारणार’

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी असे बदल आत्मसात करणे तेथील शिक्षकांना जड जात आहेत. प्रचंड पैसा खर्च केल्यानंतरही शैक्षणिक दर्जा उंचावण्याऐवजी तो खालावत असल्याने विद्यार्थिसंख्याही रोडावत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मातृभाषेबरोबर जागतिक भाषा म्हणजेच इंग्रजीचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी सांगितले.