करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भिवंडीत १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला असताना आता अंबरनाथमध्येही संपूर्ण लॉकडानची घोषणा करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार उद्यापासून हा लॉकडाउन लागू होणार आहे. यादरम्यान शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत.

अंबरनाथ नगरपरिषदेकडून यासंबंधी अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. आदेश सांगण्यात आलं आहे त्याप्रमाणे अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने येथे आरोग्य विषयत आणि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवलेली असून यासाठी अंबरनाथ नगरपरिषद प्रादूर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या हेतूने सदर विषाणूंची संक्रमणाची साखळी तोडणं आवश्यक आहे. सदर साखळी तोडण्याच्या अनुषंगाने शहरातील गर्दी कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे करोना महामारीतून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे.

करोनाचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्धेशाने शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दूध, फळे, पालेभाज्या यांची घरपोच सेवा व दवाखाने सुरु असणार आहे. २३ जून ते ३० जून दरम्यान ही सर्व दुकानं बंद असणार असून नागरिकांनी गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावंर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

याआधी भिवंडी शहरात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शहरात असणाऱ्या दाटीवाटीच्या वस्त्यांमुळे करोना संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरण्याची भीती निर्माण झाल्याने शहरात १५ दिवसांसाठी विशेष टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिवंडीमधील ही विशेष टाळेबंदी गुरुवारपासून सुरू होणार असून ३ जुलै रोजी संपणार आहे. या टाळेबंदीच्या काळात केवळ दूधविक्री, किराणा दुकाने, औषाधालये आणि दवाखाने सुरू राहणार असून शहरातील सर्व भाजी मंडया बंद राहणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.